Wed, Aug 12, 2020 21:24होमपेज › Konkan › मत्स्य आयुक्‍त कार्यालय स्थलांतरणास विरोध

मत्स्य आयुक्‍त कार्यालय स्थलांतरणास विरोध

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:43PM

बुकमार्क करा
मालवण : प्रतिनिधी

मालवण, देवगड, वेंगुर्ले या तीन तालुक्यांची धुरा सांभाळणारे मत्स्य व्यवसाय विभागाचे जिल्हा कार्यालय मच्छीमारांना विश्‍वासात न घेता कुंभारमाठ या ठिकाणी हलविण्यात येत असल्याची धक्‍कादायक माहिती उघड झाली आहे. याबाबत तालुक्यातील मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी, तसेच मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर धडक देत जिल्हा कार्यालय स्थलांतरास प्रखर विरोध दर्शवला.

दरम्यान, प्रभारी सहायक मत्स्य आयुक्‍त प्रदीप वस्त यांनी मनमानी करत मच्छीमारांना विश्‍वासात न घेता कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट घातल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केला. तर मच्छीमारांना वेठीस धरून कार्यालय स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाल्यास मच्छिमार समाज कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन छेडेल, असाही इशारा मच्छीमारांनी यावेळी  दिला.

मालवण येथील जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालय कुंभारमाठ येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मालवणमधील मच्छीमारांना मिळताच त्यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थेच्या नेतृत्वाखाली मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक दिली. उपस्थित अधिकार्‍यांनीही कार्यालय स्थलांतर होत असल्याच्या माहितीला दुजोरा दिला. मात्र आपल्याकडे आता लेखी स्वरुपात आदेश नसल्याचे सांगितले. हे कार्यालय 6 जानेवारीपासून स्थलांतरित करण्यात येणार होते, अशी माहिती धुरी यांनी सांगितली. यावर मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेत अधिकार्‍यांना जाब विचारला. गंगाराम आडकर, महेश सावजी, हेमंत मेथर, कांचन चोपडेकर, प्रदीप मोरजे, रघुनंदन खडपकर, मोहन शिरसाट, रॉकी डिसोजा, नंदकिशोर वाक्कर, रमेश मेस्त, जयवंत मालवणकर, रवींद्र रेवंडकर, भीवा आडकर, लक्ष्मीकांत सावजी, सुधीर जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने कार्यालय स्थलांतर करण्यास मच्छीमारांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यात म्हटले आहे,  मालवण येथील मत्स्य विभागाचे कार्यालयात शहरापासून तीन किमी परिसरात स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. या स्थलांतरास आमचा तीव्र विरोध आहे. स्थलांतर करण्याचा घाट घालण्यापूर्वी मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानाही विश्वासात घेण्यात आले नाही. शिवाय सध्यास्थितीत कार्यालय आहे, ती जागा मालकाने खाली करण्याची नोटीस दिलेली नसताना सहाय्यक मत्स्य आयुक्त मनमानी कारभार करत आहेत. सर्वसामान्य मच्छीमारांना कुंभारमाठ येथे कार्यालयीन कामासाठी जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कार्यालय स्थलांतर करण्याबाबतची वृत्तपत्रात अधिकृत जाहिरातही देण्यात आलेली. या सर्व बाबींचा विचार करता मच्छीमार कुठल्याही क्षणी आंदोलन छेडेल.मेघनाद धुरी व छोटू सावजी यांनी मत्स्य आयुक्‍त प्रदीप वस्त यांच्या कामकाजावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त केली. वस्त यांना कोणती गोष्ट विचारण्यास गेलो की ते प्रत्येकवेळी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीन असेच सांगतात. मालवण येथे सध्यास्थितीत शांततेत चालणारे कार्यालय कुंभारमाठ येथे हलविण्यामागे वस्त यांचाच घाट आहे. मच्छिमारांना विश्वासात न घेता परस्पर घेतला निर्णय निषेधार्थ असून मालवणातच मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय राहिले पाहिजे.

मालवणातील सध्याचे कार्यालय खाली करायचे असल्यास शहरात दुसर्‍या ठिकाणी आम्ही जागा उपलब्ध करून देवू, अशी भूमिका मच्छिमारांनी घेतली. मालवणात कार्यालयासाठी कित्येक जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहेत. मच्छिमार तसेच मच्छीमार संस्थांच्या पदाधिकार्‍याना विश्वासात घेवून मत्स्य व्यवसाय विभागाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. मत्स्य कार्यालय हे मच्छीमारांसाठी असून मच्छीमारांचाही विचार करणे क्रमाप्रात आहे, असे मेघनाद धुरी यांनी स्पष्ट केले. यावेळी वारुंजीकर यांनी मच्छीमारांच्या भावना वरिष्ठ कार्यालयाकडे पोहचविल्या जातील, असे स्पष्ट केले. यावेळी दांडी आवार येथेही मत्स्य विभागाचे प्रशिक्षण केंद्र आहे, त्याठिकाणी स्थलांतर करणे चांगला पर्याय होऊ शकतो, असे भाऊ मोरजे यांनी सांगितले.