Mon, Aug 10, 2020 04:31होमपेज › Konkan › उद्धव ठाकरे पाच वर्षे कबड्डी खेळत होते काय?

उद्धव ठाकरे पाच वर्षे कबड्डी खेळत होते काय?

Published On: Apr 08 2019 1:56AM | Last Updated: Apr 07 2019 9:58PM
मालवण : वार्ताहर

पर्ससीन, एलईडीच्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होत असून हे सत्ताधार्‍यांचे अपयश आहे. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एलईडी हद्दपार करू असे सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे ते काय कबड्डी खेळत होते का? अशी टीका आ. नितेश राणे यांनी  वायरी-जाधववाडी येथे केली. या भागात पं. स. सदस्यापासून खासदारांपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व असतानाही गेल्या पाच वर्षात येथील प्रश्‍न सुटले नाहीत. त्यांना तुम्ही संधी देऊन पाहिले, आता पुढील पाच वर्षासाठी आम्हाला संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

मालवण दौर्‍यावर आलेल्या आ. नितेश राणे यांनी देवबाग, वायरी भुतनाथ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, अशोक सावंत, मंदार केणी, यतीन खोत, अशोक तोडणकर, नारायण तोडणकर, मंदार लुडबे, संजय लुडबे, भाई मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, एलईडी मासेमारीचे संकट वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.  आता शिवसेनेचे पक्षप्रमुख एलईडी मासेमारी हद्दपार करू असे सांगत आहेत, ही त्यांची शुद्ध थाप आहे. गेल्या पाच वर्षाच्या सत्ता काळात  त्यांनी हे काम का केले नाही? असा सवाल त्यांनी केला. भविष्याचा विचार करता एलईडी मासेमारीमुळे शेतकर्‍यांप्रमाणे मच्छीमार आत्महत्या करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. एलईडी मासेमारी बंद करण्याची धमक आमच्यात आहे. त्यामुळे पोलिसांनी बाजूला हटावे मग ही मासेमारी कशी बंद करायची ते आम्ही पाहतो असे त्यांनी स्पष्ट केले. 

श्री. सामंत, श्री. तोडणकर यांनीही  विचार मांडले. यावेळी वायरी जाधववाडी येथील नारायण तोडणकर यांच्यासह शिवसेनेच्या योगेश जाधव, धनंजय जाधव, सचिन जाधव, मंदार घारे, वंदन जाधव, योगेश आचरेकर, सुशील मेस्त, पांडुरंग कुबल, अमित मायबा, विराज आचरेकर, प्रकाश घारे, सागर मायबा, कुणाल नाईक, विराज जाधव, उदय जाधव, राजा नाईक, योगेश मायबा, आनंद भगत, धीरज भगत यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभीमानमध्ये प्रवेश केला.