Tue, Aug 11, 2020 21:09होमपेज › Konkan › मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

Published On: May 27 2019 11:55PM | Last Updated: May 27 2019 11:55PM
कणकवली : वार्ताहर

भिरवंडे-परतकामवाडी येथे आपल्या माहेरी आल्यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या मांगराच्या लाकडी बारला नायलॉनच्या दोरीने प्रथम सात वर्षांच्या चिमुरडीला गळफास लावत तिने त्याच बारला स्वत:लाही गळफास लावला.  यात आई वैष्णवी विश्‍वनाथ कदम (वय 32, रा. पिसेकामते) व चिमुकली गिरिजा विश्‍वनाथ कदम (7) यांचा अंत झाला. माय-लेकींनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 10 ते 11 वा.च्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेने भिरवंडेसह परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शव आणून त्याचे विच्छेदन करण्यात आले. आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

भिरवंडे-खालची परतकामवाडी येथे माहेर असलेल्या वैष्णवी यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी पिसेकामते-कदमवाडी येथील विश्‍वनाथ कदम यांच्याशी झाला होता. विवाहानंतर हे कुटुंबीय मुंबई-भांडुप प्रतापनगर येथे स्थायिक होते. उन्हाळी सुट्टी असल्याने सौ. वैष्णवी ही आपली दुसरीत शिकणारी मुलगी गिरिजा हिला सोबत घेऊन भिरवंडे-परतकामवाडी येथील माहेरी 20 मे रोजी आली होती. सोमवारी सकाळी सौ. वैष्णवी यांचे वडील सुहास सावंत हे पत्नीला पाहुण्यांकडे पाठविण्यासाठी कनेडी येथे आले होते. तेथून ते आपली कामे आटोपून 12 वाजण्याच्या सुमारास परत घरी गेले असता मुलगी वैष्णवी व नात  गिरिजा घरी नसल्याचे निदर्शनास आले. 

शोधाशोध करत ते घरापासून काही अंतरावर शेतात असलेल्या मांगराजवळ गेले असता दरवाजा काहीसा उघडा दिसल्याने आत डोकावून पाहिल्यानंतर मुलगी व नात गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले. त्यांनी याची माहिती शेजार्‍यांना दिली. माय-लेकींनी आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कदम, महिला पोलिस  जयश्री पाटील यांच्यासह पोलिस पथकाने भिरवंडे-परतकामवाडी येथे जाऊन घटनेची पाहणी केली. माय-लेकीने गळफास लावल्याचा प्रकार समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. तो हृदयद्रावक प्रकार पाहून अनेकांचे डोळे पाणावले. 

माय-लेकीने गळफास लावून जीवन संपविल्याचे मुंबई येथील तिचे पती विश्‍वनाथ कदम यांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह सायंकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पिसेकामते येथील काही नागरिकही उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. माय-लेकींवर मंगळवारी पिसेकामते येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.