Wed, Aug 12, 2020 21:51होमपेज › Konkan › मालवणात मोहरम ताजिया मिरवणूक

मालवणात मोहरम ताजिया मिरवणूक

Published On: Sep 11 2019 2:30AM | Last Updated: Sep 10 2019 10:06PM

file photoमालवण : प्रतिनिधी

प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्‍ले सिंधुदुर्गात सुरू केलेला मोहरम ताजिया हा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेला उत्सव मंगळवारी पारंपरिक थाटात साजरा झाला. मुस्लिम बांधवांनी मंगळवारी सायंकाळी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे मोहरम उत्सव साजरा केला. मालवण बाजारपेठ-भरड-ते राजकोट अशी ढोल-ताशांसह ताबूत ताजिया मिरवणूक पार पडली. 

किल्ले सिंधुदुर्गच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मुस्लिम किल्लेदार, सरदार, सैनिक नियुक्‍त केले होते. त्यांचे काही वंशज आजही किल्‍ले सिंधुदुर्गात वास्तव्य करून आहेत. शिवकालापासून हे हिंदू व मुस्लिम बांधव सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारा मोहरम ताजिया उत्सव साजरा करतात. स्वतः छत्रपतींनी हा उत्सव सुरू केल्याचे सांगण्यात येते. आज 354 वर्षे लोटली तरी हा शिवकालीन मोहरम ताजिया आजही हिंदू-मुस्लिम बांधव तेवढ्याच उत्साहाने साजरा करत आहेत. 

मोहरम म्हणजे हजरत, मोहम्मद पैगंबर, हजरत अली (रजी), हजरत, फातिम (रजी), इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन या पाच पवित्र आत्म्यांचे प्रतीक म्हणजेच ताबूत मानले जाते. किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम-हिंदू बांधव एकत्र येत बुधवारी दुपारी 1 वा.  शिवराजेश्‍वर मंदिरात ताबूत आणला. यावेळी शिवराजेश्‍वर मंदिरात प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर शिवराजेश्‍वर मंदिरासभोवताली ताबूत मिरवणूक काढून हा ताबूत होडीच्या सहाय्याने मालवण-मेढा पिराची भाटी येथे आणण्यात आला. येथे आणखी एक ताबूत सजवून मालवण-मेढा बाजारपेठ भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. 

या मिरवणुकीतील ताबूत आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. मिरवणुकीत मालवणातील हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेढा राजकोट समुद्र किनारी या ताजीयाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले. यावेळी मालवण पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकदिशा मार्गाने दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.