Tue, Jan 19, 2021 18:07होमपेज › Konkan › करजुवेतील बेकायदा वाळूसाठा प्रकरणी मनसे आक्रमक

करजुवेतील बेकायदा वाळूसाठा प्रकरणी मनसे आक्रमक

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 10:30PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

मनसे पदाधिकार्‍यांच्या आक्रमकतेमुळे संगमेश्‍वरातील करजुवे येथील वृद्धाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तहसीलदार संदीप कदम यांनी तक्रारदार विठ्ठल नलावडे यांच्या जागेत वाळूसाठा करणार्‍याला बिनशेती परवानगी रद्द करण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. तीन गुंठे बिनशेती केलेल्या जागेत उत्खनन केलेली वाळू न साठवता ती शेजारच्या आपल्या जागेत टाकली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.

करजुवे-मांडवणेवाडी येथे राहणार्‍या विठ्ठल नलावडे यांनी तहसीलदारांकडे तीन महिन्यांपूर्वी तक्रार करून धाकटी ओहळ येथील दोन जागांमध्ये बेकायदेशीर शेडचे बांधकाम करून वाळूसाठा करण्यात आला असल्याची तक्रार केली होती. तहसीलदारांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली. वृद्धाला याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व सहकारी पदाधिकारी नंदकुमार फडतले, सचिन घारेकर, अक्षय झेपले, वैभव नारायण खेडेकर यांनी तक्रारदार वृद्धाच्या मुलीसोबत तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी योग्य दखल घेतली जात नसल्याकडे तहसीलदारांचे लक्ष वेधण्यात आले.

शेजारच्या जागा मालकाने तीन गुंठे जमीन बिनशेती करून घेऊन वाळूसाठा करण्यासाठी परवानगी घेतली. परंतु, प्रत्यक्षात वाळूचा साठा पाहिला तर ती तीन गुंठ्यात साठा करता येऊ शकत नाही. त्यामुळे ती शेजारच्या जागेत बेकायदेशीरपणे शेड बांधून जमा करण्यात आली असल्याचे तहसीलदारांना दाखवून देण्यात आले. त्यानंतर लगेचच तहसीलदारांनी तीन गुंठ्याची दिलेली बिनशेती परवानगी रद्द करण्याची नोटीस देत असल्याचे सांगितले. यावर तक्रारदार विठ्ठल नलावडे यांच्या मुलीने जे शेतीचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी केली. या बैठकीचे इतिवृत्त करण्यात आले असल्याचेही मनसेचे नेते जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.