Mon, Aug 10, 2020 04:24होमपेज › Konkan › 'गीते, निधी आणता येत नाही; मग मंत्री असून काय उपयोग?'

'निधी आणता येत नाही; मग काय उपयोग?'

Published On: Jan 15 2018 10:01AM | Last Updated: Jan 15 2018 12:37PM

बुकमार्क करा
मुरुड जंजिरा : प्रतिनिधी

मुरुड न. प. निवडणुकीला आता 13 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मुरुड न. प. शिवसेनेच्या ताब्यात असून आतापर्यंत केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी किती कोटींचा निधी दिला? हे स्पष्ट करावे. केंद्रीय मंत्र्याला राज्यशिष्टाचार असून त्यांनी केलेली मागणी ही मंजूर होतेच. फक्त इच्छा शक्ती असावी लागते. आज 13 महिन्यांचा अवधी लोटला तरी गीते निधी आणू शकत नाही. खर्‍या अर्थाने विकासकरून दाखवा व लोकांचा विेशास सार्थ करून दाखवा, असे खुले आव्हान गीते यांना आ. सुनील तटकरे यांनी केले आहे.

तालुक्यातील तेलवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, फैरोज घलटे, इम्तियाज मलबारी, स्मिता खेडेकर, नेहा पाके, विजय पैर, विहूर सरपंच मुशर्रत उलडे, नगरसेवक अविनाश दांडेकर, संजय गुंजाळ, अनंत ठाकूर, उपसरपंच निलेश तांबडकर, नितीन पवार आदी उपस्थित होते.

यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, जीएसटी ही युपीएच्या कालावधीत 4 टक्के असावी अशी मागणी होती. परंतु भाजप सरकार येताच जीएसटी ही 28 टक्के द्यावे लागत असल्याने याचा प्रचंड व्यापार व उद्योगावर परिणाम होत आहेत. सर्वधर्म समभाव ही आपली सापेक्ष कल्पना असतानासुद्धा घटनेमधून धर्मनिरपेक्षता हा शब्द वगळण्याचा प्रयत्न असून तो प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. आगामी निवडणुकीत लोकच यासरकारला त्यांची जागा दाखवून देतील. परिवर्तनाची सुरुवातच रायगड जिल्ह्यामधून झालेली दिसून येत आहे. माझे शिवसेनेला आव्हान आहे की, सन 2017 या वर्षात जिल्हा नियोजन मंडळाकडून किती निधी आणला याची आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान यावेळी सुनील तटकरे केले. तेलवडे गावासाठी 10 लाखांचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुरुड तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर म्हणाले की, अजूनसुद्धा लोकांचा तटकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर विेशास आहे. सत्ता नसली तरी साहेब निधी आणण्यात कमी पडलेले नाहीत. मुरुडसाठी तटकरे साहेबांच्या माध्यमातून 61 लाखांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे. नवीन जे लोक पक्ष प्रवेश करणार आहेत, त्यांना चाळून व गाळून पक्ष प्रवेश द्यावा, असे यावेळी दांडेकर यांनी त्यांचे स्पष्ट मत मांडले.

यावेळी तेलवडे व एकदरा येथील सुमारे 900 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. तेलवडे सदस्य प्रज्ञा बेकार, उपसरपंच निलेश तांबडकर, कमल वारंगे, मनोहर गुंड, नारायण पाटील, लक्ष्मण मिठागरी तर एकदरा येथील चिंतामणी लोदी, जनार्दन निशानदार, जगनाथ वाघरे, हरिचंद्र लोदी, ध्रुव लोदी, मनोहर गमबास, नरेश वाघरे आदी प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेशकर्ते झाले.