Sun, Sep 20, 2020 03:43होमपेज › Konkan › कुडाळात रस्ते, बाजारपेठ सुनीसुनी!

कुडाळात रस्ते, बाजारपेठ सुनीसुनी!

Last Updated: Sep 17 2020 2:12AM
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटना व नागरिकांनी बुधवारपासून सलग आठ दिवस कुडाळ शहर जनता कर्फ्यू अंतर्गत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी संघटनेने केलेल्या आवाहनाला व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद देत बुधवारी शहर बाजारपेठेतील सर्व दुकाने, आस्थापने व मच्छीमार्केट कडकडीत बंद ठेवली. त्यामुळे बाजारपेठेसह मच्छीमार्केटमध्ये शुकशुकाट पसरला होता. कुडाळ शहरात पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ बंदमुळे एस.टी.च्या फेर्‍यांनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

 जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. कुडाळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा  प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खबरदारीच्या दृष्टीने कुडाळ तालुका व्यापारी संघटना व नागरिकांनी पुढे येऊन जनता कर्फ्यू अंतर्गत कुडाळ शहर बुधवार पासून आठ दिवस 23 सप्टेंबरपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सकाळी 9.30 वा. पर्यंत दूध विक्री करण्यास सवलत देण्यात आली आहे. तसेच मोजकीच मेडीकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत.  फक्‍त वैद्यकीय सेवा 24 तास सुरू राहणार आहे. वृत्तपत्र विक्री सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहील. 
 जनता कर्फ्यूच्या आवाहनाला शहरातील व्यापारी व नागरिकांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील मोजकी मेडीकल स्टोअर्स वगळता  सर्व दुकाने व मच्छीमार्केट बंद  होते. त्यामुळे बाजारपेठेसह मच्छीमार्केटमध्ये शुकशुकाट पसरला होता. रिक्षा संघटनेनेही बंदला पाठिंबा दिला आहे. वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.  शहरात तुरळक नागरिक व वाहनधारकांची ये- जा होती. एसटीची वाहतूक  सुरू होती. मात्र कुडाळची मुख्य बाजारपेठ बंद असल्याने ग्रामीण नागरिक शहरात न आल्याने एसटीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. 

 "