कणकवली : पुढारी वृत्तसेवा
कोरोना विषाणूची परिस्थिती हाताळण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत शुक्रवारी सिंधुदुर्गात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने तोंडाला काळे मास्क बांधून आणि काळ्या फिती लावून सरकारविरोधात घोषणाबाजी करत आणि ‘महाराष्ट्र बचाव’चा नारा देत ‘आंगण ते रणांगण’ आंदोलन छेडण्यात आले. भाजपच्या सर्व तालुका कार्यालयांसमोर हे आंदोलन छेडत कणकवली जिल्हा कार्यालयासमोर माजी आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ‘पालकमंत्री हाय हाय, पालकमंत्री चले जाव’च्या घोषणा दिल्या.
महाराष्ट्र प्रदेश भाजपने राज्य सरकारच्या विरोधात शुक्रवारी ‘अंगण ते रणांगण’ नावाचे आंदोलन संपूर्ण राज्यभर पुकारले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या नियंत्रणासाठी ठोस नियोजन आणि उपाययोजना न केल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा आरोप करत राज्य सरकारचा काळ्या फिती लावून आणि काळे मास्क बांधून निषेध व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्गात सर्व तालुक्यांमध्ये आणि प्रत्येक बुथनिहाय हे आंदोलन करण्यात आले. कणकवलीत भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात माजी आ. प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी महिला जिल्हाध्यक्षा सौ. राजश्री धुमाळे, भाजप तालुकाध्यक्ष राजन चिके, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. प्रज्ञा ढवण, नगरसेवक बंडू हर्णे, विराज भोसले, शिशिर परूळेकर, पं. स.सदस्य मिलिंद मेस्त्री आदींसह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रमोद जठार यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातात सरकारच्या निषेधाचे फलक घेतले होते. जिल्ह्यात कोविड स्वॅब टेस्ट झालीच पाहिजे, मच्छीमारांना अनुदान मिळालेच पाहिजे, कोरोना रूग्णांवर मोफत उपचार झालेच पाहिजेत अशा मागण्यांचे फलक होते. प्रमोद जठार यांनी ‘राज्यातील ठाकरे सरकार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारचा निषेध असो, सिंधुदुर्गवासियांना आणि चाकरमान्यांना वेठीस धरणारे पालकमंत्री चले जाव, पालकमंत्री हाय हाय, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. राज्य सरकारप्रमाणे सिंधुदुर्गातही पालकमंत्र्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत पालकमंत्र्यांवर भाजप पदाधिकार्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.