चिपी विमानतळावर एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी, अन्य टीमकडून पाहणी

Last Updated: Jan 14 2021 1:52AM
कुडाळ ः पुढारी वृत्तसेवा

चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्प 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी किंवा त्याअगोदर 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी  सुरू करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून हालचाली वाढल्या आहेत. बुधवारी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे पथक, इंजिनिअरचे पथक व बीएसएनएल विभागाचे अधिकारी दिवसभर विमानतळ प्रकल्पावर होते. दरम्यान, गुरुवारी (दि.14) दिल्ली येथील डीजीसीएचे पथक विमानतळ प्रकल्पाची पाहणी करणार आहे.त्यानंतरच विमानतळ कार्यान्वित होण्याकरिता आवश्यक असणारा परवाना या विमानतळाला मिळणार  आहे. 

चिपी विमानतळ प्रकल्प सुरू होईल याकरिता लोकप्रतिनिधींकडून तारीख पे तारीख यापूर्वी जाहीर झाल्या पण तो दिवस उजाडला नाही. मात्र आता केंद्र व राज्य सरकारने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची प्रमुख यंत्रणा गतिमान झाली आहे. ‘डिजीसीए’चे पथक गुरूवारी विमानतळ प्रकल्पाची पाहणी करणार आहे तर पालकमंत्री रविवार 17 जानेवारी रोजी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देणार असल्याचे विकासक यंत्रनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करण्याच्या संदर्भात सर्व यंत्रणा कामाला लागली असली तरी विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणार की 23 जानेवारी रोजी स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी होणार? हे मात्र गुलदस्त्यात आहे. 

...तरच 23 जानेवारीला उद्घाटन : खा. राऊत

चिपी विमानतळावर डीजीसीएचे पथक, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीची टीम, इंजिनिअरचे पथक व बीएसएनएल विभागाचे अधिकारी कार्यरत आहेत. डीजीसीएने विमानतळ प्रकल्पाबाबतचा आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यात काही त्रुटी असल्यास त्या पूर्ण करून दिल्या जातील. त्रुटी नसल्यास डीजीसीएचा परवाना मिळेल. मात्र, अलायन्स एअर कंपनीने डीजीसीएचा परवाना मिळाल्यानंतर दहा दिवसांचा अवधी आपल्याला मिळावा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे वेळेत परवाना मिळाल्यास 23 जानेवारीला विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन होऊ शकते, असे खा. राऊत यांनी सांगितले.