Sat, Oct 24, 2020 09:32



होमपेज › Konkan › कोरोनाच्या निर्णायक लढ्यात  मास्क हीच लस : मुख्यमंत्री

कोरोनाच्या निर्णायक लढ्यात  मास्क हीच लस : मुख्यमंत्री

Last Updated: Oct 19 2020 1:21AM




रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाविरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्क हीच उत्तम लस ठरणार आहे, याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवावी आणि इतरांना जाणीव करून द्यावी. कोरोनाची दुसरी लाट येऊ न देण्यासाठी प्रत्येकाने  मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव 
ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.

ऑनलाईन पद्धतीने या थेरपी सेंटरचा शुभारंभ रविवारी झाला. जिल्हा रुग्णालयात ही व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा बनला आहे. या कार्यक्रमाला मुंबईतून पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, जालन्यातून  सार्व. आरोग्यमंत्री  राजेश टोपे, रत्नागिरीतून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबतच खा. विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले. तसेच जि.प.चे अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आदी उपस्थित होते.

कोकणला सागरी लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण, कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे.  कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझमा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणार्‍या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याच पध्दतीने आगामी काळात जाणीव व जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन करायचे की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता ठेवून कोरोनाला लांब ठेवायचे याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहीजे असे त्यांनी सांगितले.

प्लाझ्मा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी आरोग्य विभागाचे विशेष अभिनंदन केले.

जिल्ह्याला आरटीपीसीआर प्रयोग  शाळेची आवश्यकता आहे, असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ मान्यता दिली. त्यांच्याच संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सुरु झाली. यामुळे रत्नागिरीत कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले या बद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो असे सांगून परिवहन तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी जिल्हा प्रशासनाचेही याबद्दल अभिनंदन केले.

या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली.  या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 





 







"