होमपेज › Konkan › कुडाळला झोडपले!

कुडाळला झोडपले!

Last Updated: Jun 13 2020 11:04PM
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

कुडाळ तालुक्याला शनिवारीही धुवाँधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारी 3 च्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाच्या सरीवर सरी बरसल्या. या पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कुडाळ ते पणदूर दरम्यान ठिकठिकाणी मातीचा भराव खचला. तर पावशी तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्ग ठेकेदाराने योग्य प्रकारे उपाययोजना न केल्याने तेथील घरे व दुकानांना पाण्याचा फटका बसला. तेथे पावसाच्या मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याने दुकानाला वेढा घातला.

गेले आठ दिवस तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. शनिवारीही पावसाचा जोर कायम होता. सकाळच्या सत्रात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावली. तीन वाजताच्या 
सुमारास सरीवर सरी बरसल्या. या पावसाने व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली. कुडाळ शहरात ठिकठिकाणी रस्त्यालगतची गटारे बुजल्याने रस्त्यावरून पाणी उलटले. नवीन बसस्थानक, पोस्ट ऑफिस येथे मुख्य रस्त्यावरून गटाराचे पाणी वाहत होते. या पाण्यातून वाहने व पादचारी नागरिक मार्गस्थ होत होते.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामालाही पावसाचा फटका बसला. ठिकठिकाणी पावसात मातीचा भराव खचण्याचे प्रकार सुरूच आहेत. शनिवारीही ठिकठिकाणी भराव खचला. या भरावाची माती लगतच्या शेत जमीनीत वाहून जात असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. काही ठिकाणचे पर्यायी, सर्व्हिस व जोड रस्ते खड्डे, चिखल व पाण्यामुळे समस्याग्रस्त बनले. याचा नाहक त्रास वाहनधारकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान पावशी ग्रामपंचायत कार्यालय नजिक घरे व दुकानाजवळ पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. तेथे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार प्रशासनाने न घेतल्याने तेथे पावसाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. यावर्षीही पहिल्याच पावसात तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शनिवारी तेथे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली. घरे व दुकानांपर्यंत हे पाणी आले.तेथील एका दुकानात पाणी शिरून नुकसान झाले. गेली दोन वर्षे याठिकाणी पावसाळ्यात समस्या ही समस्या निर्माण होत असून त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात वीज, दूरध्वनी सेवा काही काळ विस्कळीत झाली. पहिल्याच पावसात ग्रामीण भागात चढणीचे मासे व खेकडे पकडण्यासाठी खवय्यांची सध्या धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.