Tue, Jan 19, 2021 16:20होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात चौथा बळी

रत्नागिरी जिल्ह्यात चौथा बळी

Last Updated: May 23 2020 1:41AM
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी रात्री दोनवेळा कोरोना संशयितांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्‍त झाले. मात्र, यातील काही अहवाल दोनदा पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे आकडेवारीत तफावत निर्माण झाली होती. अखेर जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा माहिती देताना 19 नवे रुग्ण सापडल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा 132 वर पोहोचला आहे.

दरम्यान, एका महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा 4 झाला आहे. कळंबणी येथील परिचारिकेला कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. हा बळी चिपळुणातील आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार गुहागार 2, दापोली 2, रत्नागिरी 2 तर संगमेशवरातील एक कोरोनाबाधित वाढल्याने दिवसभर वाढीव रुग्णाची संख्या 19  झाली.      

                              
जिल्ह्यातील कोरोना संशयित स्वॅब घेतलेल्यांचे अहवाल गुरुवारी रात्री प्राप्‍त झाले. मात्र, यात दोन वेळा काही रुग्णांची नावे असल्याने, आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाला.  अकरापैकी नऊ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली तर दोन रुग्ण तपासणी करुन घरी गेल्याचे सांगण्यात आले.  मात्र, या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असल्याचे तर एक कळंबणी येथे उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका असल्याची माहिती पुढे आली आहे.

सर्वच रुग्ण मुंबईतून आले असल्याचेही सांगण्यात आले. पेशंटच्या नावामुळेही गोंधळ उडाला होता.  त्यानंतर कामथे येथील रुग्णाच्या आडनाव भिन्‍नतेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, या रुग्णाचा शोध लागल्याने जिल्ह्यातील  शुक्रवारअखेरचा आकडा 125 झाला आहे.

महिला रुग्णाचे दोन दिवसापूर्वी निधन झाले होते. मात्ररत्नागिरी येथे अंत्यसंस्कार करण्याला काही तथाकथित पुढारी व नागरिकांनी विरोध केल्यामुळे, या महिलेचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील नारदखेरकी-गोंधळीवाडी येथे नेण्यात आला. मुलगा व जावई यांनी गावी मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार पार पाडले.

जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी परजिल्ह्यांतून येणार्‍या व्यक्‍तींना पास असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश महसूल यंत्रणा व पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये काहीजण बनावट पास घेऊन येताना सांगली पोलिसांनी अडवले होते व त्यांना परत पाठवले होते. त्यामुळे आता बनावट पास तपासण्याच्या स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत.

चिपळुणात पहिला बळी

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

जोगेश्‍वरी (मुंबई) येथून तालुक्यातील नारदखेरकी येथे आलेल्या 60 वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. ही महिला कामथे रुग्णालयात दाखल होती. तिला त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या स्वॅब नमुन्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. 

दरम्यान, नारदखेरकी गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वी ही महिला गावी आली. यानंतर एक दिवस राहिल्यानंतर तिला कामथे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अस्थमा तसेच हायपरटेन्शनच्या   आजाराने ही वृद्धा त्रस्त होती. याच दरम्यान तिचा स्वॅब नमुनाही घेण्यात आला होता. त्यानंतर रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. त्यात अहवालही पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनात खळबळ उडाली. 

शुक्रवारी सकाळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी नारदखेरकी येथे भेट दिली. तेथील गोंधळीवाडी ग्रामस्थांबरोबर बैठक घेतली. त्या वृद्धेचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती देण्यात आली. यानंतर तेथील सीमा बंद करण्यात आल्या. दरम्यान, आरोग्य विभागाने नारदखेरकी येथे तपासणी सुरू केली असून यंत्रणा कामाला लागली आहे.