Wed, Aug 12, 2020 09:53होमपेज › Konkan › पाच वर्षांचा विकास आराखडा तयार

पाच वर्षांचा विकास आराखडा तयार

Published On: Apr 12 2019 2:05AM | Last Updated: Apr 11 2019 9:30PM
दापोली : प्रतिनिधी 

पुढील पाच वर्षांत विकासाचा आराखडा आपल्याकडे तयार आहे. प्रदूषणविरहीत उद्योग, पायाभूत सुविधांची निर्मिती, पर्यटन पूरक योजना तयार आहेत. त्या आपण केंद्राच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात राबविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जालगाव येथील प्रचार सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. संजय कदम, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, नगरसेवक सचिन जाधव, अजय बिरवटकर, ममता शिंदे, प्रदेश प्रवक्‍ते मुजीब रुमाणे आदी उपस्थित होते.

तटकरे म्हणाले की, केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमानंतर अनंत गीतेंनी दिल्लीत पत्रकार परिषद  घेऊन आता रोजगाराची प्रचंड निर्मिती होईल, नवीन उद्योग उभे राहतील असे सांगितले होते. मात्र, यातील किती रोजगार या मतदारसंघात दिले? किती कारखाने आपण आणू शकलो? याचे उत्तर ना. गीते यांनी द्यावे. रखडलेल्या सागरी महामार्गाला पूर्णत्वास नेऊन त्याला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे नाव देण्याचे आपले स्वप्न आहे. ते स्वप्न आपण खासदार झाल्यावर प्राधान्याने पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दापोली या कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयाच्याच ठिकाणी महाविद्यालयाची गरज असून  ते  करावेच लागेल. आपण अर्थमंत्री असताना आपण रोहा येथे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कोर्स सुरू केला. येथून बाहेर पडलेला विद्यार्थी लाखो रूपयांचे  पॅकेज घेतो. दापोली येथील हॉल्टिकल्चर मुळदे येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे दापोली येथे नव्याने हा कोर्स उपलब्ध करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सीआरझेडमध्ये सुधारणा करू

सीआरझेड कायद्यात आपण बदल करून आणला, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम सांगतात तर त्यांनी सांगावे दिल्लीत जाऊन कोणत्या मंत्र्यांना तुम्ही भेटलात?  कायद्यातील या बदलाचा फायदा रत्नागिरी येथील केवळ लोकसंख्येची घनता असलेल्या एका गावाला होणार आहे.  यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. हा बदल व सुधारणा आपण खासदार झाल्यावर पहिल्यांदा करू व येथील पर्यटन उद्योगाला चालना देऊ, असे तटकरे यांनी यावेळी सांगितले.