Mon, Sep 21, 2020 18:48होमपेज › Konkan › ठेकेदारांना पोसण्यासाठी नको तर जनतेसाठी रस्ते करा!

ठेकेदारांना पोसण्यासाठी नको तर जनतेसाठी रस्ते करा!

Last Updated: Feb 15 2020 12:54AM
ओरोस : पुढारी वृत्तसेवा

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असून पोट ठेकेदारी पध्दतीमुळे कामाचा दर्जा घसरत असल्याचा आरोप  सदस्यांनी  केला. या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, ठेकेदारांना पोसण्यासाठी रस्ते करू नका तर जनतेसाठी रस्ते करा, असे सांगत संबधित योजनेत पोट ठेकेदारी पध्दत थांबवा, असे आदेश खा. विनायक राऊत यांनी  दिले.कणकवली शहरातील रेंगाळलेले भूमिगत विद्युतीकरण  दिरंगाईबाबत खा. राऊत यानी  नाराजी व्यक्त करत याची  गंभीर दखल घेतली जाईल, असे सांगितले.

जिल्हा ग्रामीण विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खा.विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. जि.प.अध्यक्षा समीधा नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आ. वैभव नाईक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त सीईओ राजेंद्र पराडकर, जि.प. सदस्य नागेंद्र परब, अशासकीय सदस्य सोमा घाडीगावकर, शिवदत्त घोगळे, अस्मिता राणे, मयुरी देसाई, मीनल तळगावकर, आनंद ठाकूर, सुजीत जाधव, संतोष पाटिल, पं.स. सभापती, अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र ही कामे काही ठेकेदार आपल्या नावावर घेवून ही कामे पोट ठेकेदाराला देतात. ही कामे त्या पोट ठेकेदारांकडून आपले मार्जिन ठेवून काम केले जाते. यात कामांचा दर्जा राहत नाही. परिणामी कामे बोगस आणि निकृष्ट होतात. पोट ठेकेदारीमुळे कामांचा दर्जा घसरत असल्याचा  आरोप अशासकीय सदस्य सोमा घाडीगावकर यांनी सभेत केला. या योजनेंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी खा. राऊत यांच्याकडे केली.

पडिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत फळझाड लागवड केली जात आहे. सद्यस्थितीत 60 हजार हेक्टर जमीन पडिक असून चालू वर्षात 5418 हेक्टर वर फळझाड लागवड केली आहे. यावर्षी 6600 हेक्टर वर लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून कृषी सहाय्यकांना लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिल्यास जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली येवू शकेल असे अधिकार्‍यांनी सांगितले. 

बांबू लागवड मिशन अंतर्गत जिल्ह्यात 1174 हेक्टरवर बांबूची लागवड करण्यात आली आहे. याला जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे. मात्र या योजनेसाठी अनुदान कमी पडत असल्याचे रोहयोच्या अधिकार्‍यांनी सांगितले. अनुदान मिळाल्यास बांबूची जादा रोपे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देता येतील असे सांगण्यात आले. पठारी भागातील पडिक जमिनीवर शेतकर्‍यांनी काजू, आंबा पिकांची लागवड केली आहे. आता डोंगर उतरावरील जमिनी पडिक रहिल्या आहेत, त्या ठिकाणी बांबू लागवड होवू शकते असे अधिकार्‍यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री 17 व 18 फेब्रुवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर असून यावेळी कृषी मंत्री, अधिकारी यांची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत हा विषय ठेवून जादा अनुदानाची मागणी करा अशी सूचना खा. विनायक राऊत यांनी केली.
  जि.प. आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय अंतर्गत वैद्यकीय अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त असून मुख्यमंत्री दौर्‍यात आरोग्य विभागाच्या रिक्त पदांचा मुद्दा प्रामुख्याने समोर येणार आहे. त्यावेळी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष वेधणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांची परिपूर्ण माहिती ठेवा अशी सूचना खा. राऊत यांनी केली. 

 सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ असल्याने या ठिकाणी दर्जेदार रस्ते होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करावेत अशी सूचना खा. राऊत यांनी केली. दरम्यान प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेले परंतु 10 वर्षे पूर्ण झालेले रस्ते आता नादुरुस्त झाले आहेत. 10 वर्षे झाल्याने पीएमजीएसवाय अंतर्गत त्यावर निधी खर्च करता येत नाही आणि रस्त्यांची लांबी एवढी जास्त आहे की अन्य विभाग ते दुरुस्त करू शकत नाही. त्यामुळे असे रस्ते सुस्थितीत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी जि.प. सदस्य नागेंद्र परब यांनी केली.
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अनेक कामे मंजूर होतात. मात्र त्यांची कामे वेळेत सुरू होत नाहीत. जिल्ह्यात 19 कामे अशी आहेत की ती कामे मंजूर होवून 2 वर्षे झाली तरी कामे अद्याप सुरू झाली नसल्याचा आरोप नागेंद्र परब यांनी केला. यावर काही रस्त्यांची कामे ही ग्रामस्थांनी अडविली असल्याने आणि जागेचा प्रश्न उद्भवत असल्याने सुरू करता आली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र यावर खा.विनायक राऊत यांनी नाराजी व्यक्त करत दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामांची माहिती घ्या. जे ठेकेदार कामे सुरू करत नाहीत त्यांना टर्मिनेट करा आणि नव्याने निविदा काढून कामे पूर्ण करून घ्या असे आदेश खा. राऊत यांनी बैठकीत दिले.

 "