Sat, Jul 11, 2020 10:58



होमपेज › Konkan › जिल्हा पुन्हा ‘लॉकडाऊन’

जिल्हा पुन्हा ‘लॉकडाऊन’

Last Updated: Jul 02 2020 7:57AM




रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. 1 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून  8 जुलैच्या कालावधीत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले असले तरी अशा सेवांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

‘लॉकडाऊन’च्या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी सायंकाळी आदेश जारी केले आहेत. लॉकडाऊनची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडण्यात बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद असून, कोणालाही जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. अगदी पास असलेल्यांनाही प्रवेश नाकारण्यात येणार आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना बंदी आहे. शासकीय, 

निमशासकीय कार्यालयात 10 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती राहील. खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. पाणी आणि सांडपाणी व्यवस्था, फळे, भाजीपाला, दूध, ब्रेड, किराणा, बँका आणि दूरध्वनी सुविधा सुरू राहणार आहे. मासे व मांसविक्री केवळ बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच सुरू राहील.  या कालावधीत सर्व रुग्णालये, नर्सिंग, लॅबोरेटरी, मेडिकल, वैद्यकीय उपकरणांची दुकाने, चष्मा दुकाने सुरू राहणार आहेत. पेट्रोल व ऑईल सुरू राहील. जे प्रक्रिया उद्योग बंद ठेवणे शक्य होणार नाही ते सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू राहील. शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्रीला ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. 

अंत्यविधीसाठी पूर्वीप्रमाणेच केवळ 20 जणांनाच परवानगी राहणार आहे. शेतीशी निगडित यंत्रणा, शीतगृहे सुरू राहणार आहेत. सकाळी 9 ते 5 या कालावधितच आस्थापना सुरू राहणार असून, नाईट कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.