Wed, Aug 12, 2020 21:43होमपेज › Konkan › समन्वय, पाठपुरावा नसल्याने पाणीटंचाई कामे रखडतात

समन्वय, पाठपुरावा नसल्याने पाणीटंचाई कामे रखडतात

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:08PM

बुकमार्क करा

देवगड ः प्रतिनिधी

समन्वय व पाठपुरावा नसल्या मुळे टंचाईची कामे रखडून राहतात. अधिकार्‍यांनी टंचाईच्या कामांची केवळ कागदोपत्री पूर्तता न करता, जनतेचे समाधान होईल अशी कामे करावीत, अशा सुचना आ. नितेश राणे यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. देवगड तालुका पाणी टंचाई निवारण कृती आराखडा समन्वय सभा आ. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जामसंडे येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात झाली. तहसीलदार वनिता पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी श्रीपाद पाताडे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि.प.सदस्य गणेश राणे, सौ.सावी लोके, वर्षा पवार, अनघा राणे, पं.स.सदस्य सुनिल पारकर, लक्ष्मण पाळेकर, डॉ.अमोल तेली, अजित कांबळे, निकीता कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणे आदी उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, टंचाई कामांमध्ये समन्वय व पाठपुराव्याचा अभाव दिसत असल्याने कामे पुर्णत्वास जात नाहीत. सरपंच,  ग्रामस्थांना कामांच्या पुर्ततेबाबत योग्य माहिती संबंधित विभागाकडून दिली जात नाही.  खुर्ची व पद वाचविण्याचा हेतुने पाणीटंचाई आराखडा मंजुर करून घेत असाल तर होवू देणार नाही, अशा शब्दात त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना सुनावले.
तालुक्यात पाण्याचा प्रश्‍न जिव्हाळ्याचा आहे. त्यात चालढकल होत असेल तर बैठकीचा उपयोग काय? असा प्रश्‍न केला. पाणीटंचाई कामांच्या सर्व प्रक्रियेत जनतेनेही सहभागी व्हावे व  पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रभारी अधिकारी श्री.पाताडे यांनी गत टंचाई आराखड्यातील पूर्ण झालेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये टंचाईचा कामांची 26 अंदाजपत्रके सादर केली असून 23 कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे सांगितले. नळयोजना विशेष दुरूस्तीमध्ये चार नळयोजनांचा समावेश होता. पैकी कोटकामते येथील काम प्रगती पथावर असून पाटथर, वाघोटन, पोंभुर्ले ही तीन कामे रखडली आहेत. विंधन विहीरीच्या 9 मंजुर कामांपैकी 2 कामे बक्षिसपत्राअभावी रद्द झाली. देवस्थान इनाममुळे खुडी ग्रामपंचायतीची कामे झाली नाहीत याकडे खुडी सरपंचांनी लक्ष वेधले. मणचे व्याघे्रश्‍वर नळ योजनेबाबत समाधानकारक उत्तर पाणीपुरवठा अधिकार्‍यांकडून न मिळाल्याने आ. नीतेश राणे यांनी चांगलेच सुनावले. पाटथर सरपंच प्रमोद शेठ यांनी गावातील टाकीचा प्रश्‍न मांडला. यावेळी बहुतांशी  सरपंच, ग्रामसेवक यांनी डिसेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण होतील असे आश्‍वासन दिले.या सभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.