Wed, Aug 12, 2020 13:12होमपेज › Konkan › गिरणी कामगारांच्या घरांबाबत निर्णय आठवडाभरात 

गिरणी कामगारांच्या घरांबाबत निर्णय आठवडाभरात 

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:29PMचिपळूण : प्रतिनिधी

येत्या आठवडाभरात गिरणी कामगारांच्या घरांची कार्यवाही सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्‍नांबाबत आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चा रद्द केला आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, रयतराज कामगार संघटना, गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल गिरणी कामगार एकता मंच या पाच कामगार संघटनांनी एकत्र येऊन हे संघर्षाचे पाऊल उचलले होते.

कामगार संघटनांनी मोर्चाचा इशारा दिल्यानंतर ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी कामगार नेत्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. यावेळी कृती संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडीलकर-पांडे, राष्ट्रीय मिल मजदूरचे गोविंदराव मोहिते, जयप्रकाश भिलारे, प्रवीण घाग, नंदू पारकर यांसह  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांतील गिरणी कामगार उपस्थित  होते.

आजपर्यंत 1 लाख 75 हजार कामगार व त्यांच्या वारसांनी घरांसाठी अर्ज भरले आहेत. मात्र, या अर्जांची छाननी धीम्या गतीने सुरू आहे. मॉनिटरी कमिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांकडेही ‘म्हाडा’कडून दुर्लक्ष होत आहे. ज्यांना सोडतीमध्ये घरे मिळाली आहेत अशांचा कर्जाचा हप्‍ताही सुरू झाला. मात्र, अद्याप घरांचा पत्ताच नाही. या व अशा अन्य समस्यांचा पाढाच या बैठकीत कामगार नेत्यांनी वाचला. 

यावर उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर यांनी ‘म्हाडा’च्या संबंधित अधिकार्‍यांना तातडीने घरांच्या प्रश्‍नांबाबत सूचना केल्या आहेत. तसेच आठवडाभरात याबाबत आढावा देण्यात येईल, असे आश्‍वासन नेत्यांना दिले आहे. तसेच घरासंबंधी आयुक्‍त कार्यालयात अडकलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आश्‍वासन कामगार उपायुक्‍त शिरीन लोखंडे यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी येत्या काही दिवसांत गिरणी कागारांच्या घरांचा प्रश्‍न न सुटल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा कामगार नेत्यांनी दिला आहे.