Mon, Aug 10, 2020 05:17होमपेज › Konkan › वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

Last Updated: Jun 04 2020 10:35PM

कुडाळ :वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. (छाया : काशिराम गायकवाड, कुडाळ)कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

वटपौर्णिमेसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य कुडाळ बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. या साहित्यासह बी- बियाणे, कृषी विषयक व अन्य विविध प्रकारचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गुरूवारी मोठी गर्दी झाली. त्यामुळे बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. दरम्यान, वाहनांची रहदारी वाढली आहे.  बाजारपेठेत मास्क न लावता फिरणार्‍या नागरिकांना पोलिसांनी दणका दिला. 

शुक्रवारी वटपौर्णिमा सण असल्याने यासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य कुडाळ बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. वटवृक्षाची पाने व फांद्या, फणस, आंबे, अननस, केळी यांसह वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी महिलावर्गाची वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोस्ट ऑफिस, जिजामाता चौक तसेच बाजारपेठेत वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य दाखल झाले होते. अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने व्यापारी तसेच नागरिकांची धावपळ उडाली. शहरात वाहनांचीही रहदारी वाढली आहे.  गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला होता. दरम्यान बाजारपेठेत पोलिस कर्मचारी तैनात होते. मास्क न लावता फिरणार्‍यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला. मास्क खरेदी करून तत्काळ तोंडाला बांधण्याच्या सूचना पोलिसांकडून त्यांना दिल्या जात होत्या.

गर्दी न करण्याचे आवाहन

कुडाळ शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता नगरपालिकेने लाऊडस्पिकरच्या माध्यमातून नागरीकांना शहरात गर्दी न करण्याचे आवाहन केले. व्यवसायिकांनाही दुकानासमोर पाच पेक्षा अधिक व्यक्‍तींना उभे करू नका, नागरीकांनी आपली वाहने रस्ता दुर्तफा न लावता शहरातील मोकळ्या जागेत लावावीत असे आवाहन केले. मात्र त्या आवाहनाला वाहन चालक व नागरीकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.