Tue, Jun 15, 2021 13:35
‘अनलॉक’च्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी झुंबड

Last Updated: Jun 11 2021 2:49AM

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारपासून अनलॉक करण्यात आल्यानंतर सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने किराणा, भाजीसह पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूरसह शहरांमध्ये दिसून आले.

जिल्ह्यात बुधवारी रात्रीपर्यंत कडक लॉकडाऊन होते. गुरुवारपासून अनलॉक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले होते. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळा, असे आवाहन जिल्ह्यातील जनतेला त्यांनी केले होते. मात्र, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

रत्नागिरीमध्ये सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिक किराणा, भाजीसाठी बाहेर पडले होते. शहरातील प्रमुख मार्गांवर अनेक भाजी व्यावसायिकांनी कांदे, बटाटे  व भाजीच्या गाड्या  उभ्या केल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी भाजीच्या स्टॉलसमोर गर्दी केली होती. त्याचप्रमाणे पावसाळी साहित्य खरेदीसाठीही मार्केटमध्ये दुकाने फुल्‍ल झाली होती. 

आठ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हैराण झालेले नागरिक बहुसंख्येने बाहेर पडल्याने, रत्नागिरी कोरोनामुक्‍त झाली की काय? अशी शंका निर्माण झाली होती. रत्नागिरी शहराप्रमाणेच चिपळूण, खेड, राजापूर, दापोली, लांजा, गुहागर-शृंगारतळी, देवरूख याठिकाणीही मोठी गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.