होमपेज › Konkan › भरकटलेल्या ‘बाहुबली’ला तटरक्षक दलाचा आधार

भरकटलेल्या ‘बाहुबली’ला तटरक्षक दलाचा आधार

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:57PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी किनार्‍यापासून 23  सागरी मैल अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे भरकटलेल्या कर्नाटकाच्या ‘स्टार फिश -बाहुबली’ या मच्छीमार नौकेला मध्यरात्रीच्या काळोखात शर्तीचे प्रयत्न करीत येथील तटरक्षक दलाच्या कार्यालयाने प्रसंगावधान दाखवून या बोटीला आधार दिला. ही घटनेचा थरार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भर समुद्रात अनुभवायला मिळाला.

न्यू मंगळूर स्थित तटरक्षक दलाच्या मुख्यालयातून दुपारी 2.20 वाजता कर्नाटकाची ‘स्टार फिश- बाहुबली’ ही मच्छीमार नौका गीअर बॉक्स निकामी झाल्याने भरकटली असून ती रत्नागिरी किनार्‍यापासून  सुमारे 23 समुद्र मैल अंतरावर असल्याची आपत्कालीन सूचना भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी कार्यालयाला मिळाली. ही सूचना मिळताच तटरक्षक दलाच्या रत्नागिरी कार्यालयाने तत्काळ या मच्छीमार नौकेच्या तांडेलाशी व्ही. एच. एफ. संपर्क यंत्रणेद्वारा संपर्क साधला.

तेव्हा हे जहाज सात खलाशांसाह दक्षिण-पश्‍चिम दिशेस भरकटत जात असल्याची माहिती मिळाली. आता ही मोठी मच्छीमार नौका शोधून त्यातील सर्व खलाशांना सुखरूप किनार्‍यावर आणणे हे तटरक्षक दलापुढे आव्हान होते. या कार्याला तडीस नेऊ शकेल, असे तटरक्षक दल रत्नागिरीचे ‘सी - 402’ हे जहाजदेखील यावेळी जहाजात वापरावयाच्या कॅमेर्‍याची कार्यक्षमता पडताळण्यासाठी मुरुडला गेले होते. रत्नागिरी व सिंधुदुर्गचे तटरक्षक दलाचे प्रमुख कमांडंट एस. आर. पाटील यांनी 85 सागरी मैल अंतरावरील मुरुडला गेलेल्या जहाजाला ‘ऑपरेशन-बाहुबली’साठी येण्याचे आदेश दिले होते.

मुरुड बंदरापासून ‘बाहुबली’ मच्छीमार नौका सुमारे 70 सागरी मैल अंतरावर होती. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास निघून ‘ओखी’ वादळानंतरच्या खवळलेल्या व उधाण आलेल्या समुद्रात सुमारे 10-12 सागरी मैल प्रती तास या वेगाने प्रवास करत ‘सी - 402’ हे जहाज उपसमादेशक अभिषेक करुणाकर यांच्या नेतृत्वाखाली भटकलेल्या नौकेच्या ठिकाणावर शुक्रवारी रात्री सुमारे 10:15 वाजता पोहचले. परंतु, रात्रीच्या काळोखात तसेच तेथे आसपास असलेल्या 30 ते 35 इतर मच्छीमार नौकांमध्ये भरकटलेली नौका शोधणे कठीण होते. त्यामुळे सर्च लाईटचा वापर करून, व्ही. एच. एफ. संपर्क यंत्रणा, सॅटेलाईट यंत्रणा, भोंगा इत्यादी साधनांचा वापर करीत सतत पाठपुरावा करून अखेर सुमारे 10:45 वाजता ही नौका शोधण्यात तटरक्षक दलास यश मिळाले. या कामी तटरक्षक दलाच्या मुंबईस्थित जिल्हा व क्षेत्रीय मुख्यालये तसेच सागरी बचाव समन्वय केंद्र यांची बरीच मदत झाली. 

मासेमारी करून परतीच्या मार्गावर असलेल्या या नौकेवर सुमारे एक टन मासळी होती, जेवणाची रसद संपत आली होती. तसेच 24 तासांपेक्षा जास्त काळ भरकटलेली असल्याने सर्व मच्छीमार घाबरलेल्या परिस्थितीत होते.  त्यानंतर ‘सी-402’ या जहाजापुढे दोरीच्या सहाय्याने इंजिन निकामी झालेल्या समतुल्य व मासळीने भरलेल्या नौकेला खवळलेल्या समुद्रातून टो करून सुखरूप किनार्‍यावर आणण्याचे आव्हान होते.  येथील तटरक्षक दलाच्या कार्यालयाने हे आव्हान पेलताना ‘बाहुबली’ला सुरक्षित तळावर आणले.

खवळलेल्या सागरात साडेतीन तासाचा संघर्ष

‘बाहुबली’ला तटरक्षक दलाच्या जवानांनी दुर्घटनाग्रस्त नौकेस ‘सी - 402’ या  जहाजाला बांधले. सुमारे 4-5 सागरी मैल प्रती तास या वेगाने या नौकेस टो केले. वजनदार नौकेस समुद्रातून टो करताना अस्थिर करणार्‍या लाटांनी मोठे अपघात होण्याची शक्यता असते. उधाण आलेल्या व प्रचंड हेलकावे देण्यार्‍या समुद्रात ही नौका शुक्रवारच्या रात्री 11:05 वाजेपासून खेचण्यास सुरुवात केली गेली व शनिवारी पहाटे 2:45 वाजता तिला जयगड येथे आंग्रे पोर्टवर आणण्यात आले.  उसळलेल्या सागरात रात्रीच्या काळोखात सुमारे साडेतीन तास हा संघर्ष सुरू होता. शनिवारी सकाळी 11 वाजता ती बंदर विभागाच्या जेटीवर दुरुस्तीसाठी आणण्यात आली.