Sun, Aug 09, 2020 10:21होमपेज › Konkan › विमानाचं ‘भरकटणं’ पुन्हा नको!

विमानाचं ‘भरकटणं’ पुन्हा नको!

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 10:40PMगणेश जेठे
 

अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅण्ड होणारे आणि ज्याची प्रतीक्षा सिंधुदुर्गवासीय गेले 19 वर्षे करत आहेत ते समृध्दीचे, विकासाचे आणि प्रगतीचे विमान भरकटले होते खरे परंतु ते आता 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा.च्या मुहूर्तावर सिंधुदुर्ग भूमीवर उतरणार आहे. आवडत्या गणपतीच्या आगमनापूर्वी विमान चिपीच्या माळरानावर उभारलेल्या देखण्या विमानतळावर उतरेल आणि समृध्दीचे हे प्रतिक ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचे मालवणी माणसाचे स्वप्नही त्यामुळे सत्यात उतरणार आहे. 10 सप्टेंबर रोजी विमान उतरले नाही आणि 12 सप्टेंबर रोजीचेही विमान लॅण्ड होणार  की नाही, याबाबत संभ्रम कायम होता. ते उतरणारच याबाबत  सोमवारी सकाळपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती हाती आली नव्हती. अखेर हे विमान बुधवारीच उतरणार असल्याची अधिकृत माहिती आयआरबीच्या सूत्रांनी दिली. त्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या विमान उतरण्याच्या शुभवार्तेला दुजोरा दिला.

आयआरबी कंपनीचे हे विमान उतरणार असून त्यामध्ये तंत्रज्ञ असणार आहेत. या विमानाच्या स्वागतासाठी पालकमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गेले चार पाच दिवस हे विमान उतरण्याच्या पार्श्‍वभूमीवर जे काही श्रेयवादाचे नाट्य शिवसेना-भाजपमध्ये रंगले त्या पार्श्‍वभूमीवर या विमानाचे स्वागत करताना कुणाच्याही भावना दुखावल्या जावू नयेत याची काळजी आता शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. पुढील दोन महिन्यात विमान प्राधिकरणकडून अनेक परवानग्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर  विमान  वाहतूक नियमितपणे सुरू होणार आहे. 

या देखण्या आणि सुसज्ज विमानतळाची बांधणी करणार्‍या आयआरबी कंपनीने सरकारची ‘विमानघाई’ लक्षात घेऊन रात्रीचा दिवस करून विमानतळ तांत्रिकदृष्ट्या सज्ज ठेवण्यासाठी गेले दोन महिने युध्दपातळीवर काम सुरू ठेवले. आयआरबी कंपनीने ‘आम्ही विमान लॅण्डींगसाठी सज्ज आहोत’ असा मेसेज सरकारला दिला होता. तब्बल 520 कोटी रूपये खर्च करणार्‍या या कंपनीला हे विमानतळ चालवायचे आहे आणि अर्थातच गुंतवणूक केलेली रक्कम वसूल करायची आहे. त्यामुळे या कंपनीने आपल्या कामात कोणतीही ‘कसर’ सोडायची नाही, अशी भूमिका घेतली होती. म्हणूनच त्यादृष्टीने सर्वती काळजी आयआरबी कंपनीचे तंत्रज्ञ व अधिकारी घेत होते. हे विमानतळ आयआरबी कंपनी चालविणार असली तरीदेखील तांत्रिकदृष्ट्या या विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचेच नियंत्रण असणार आहे. त्यामुळे आता या प्राधिकरणचे तंत्रज्ञ सर्व ती यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी कामाला लागलेली आहे.

आयआरबी कंपनीने विमान उतरविण्यास आणि टेकऑफ घेण्यास उत्सुक असताना सरकारने तांतडीने हिरवा कंदील दाखविणे आवश्यक होते. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित सरकारी संस्थांच्या परवानग्या मिळणे बाकी होत्या. आता त्या मिळाल्या आहेत.या परवानग्या देण्याची नैतिक जबाबदारी सुदैवाने सध्या विमान वाहतूक खात्याचे केंद्रीयमंत्री असलेल्या सुरेश प्रभू यांची होती. सुरेश प्रभू हे सिंधुदुर्ग सुपूत्र असल्याने मालवणी माणसाचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरेश प्रभू स्वतःहून पुढाकार घेतील अशी अपेक्षा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे.

खरेतर पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत यांनी चिपी विमानतळावर 12 सप्टेंबर रोजी लॅण्डींग होणार असल्याचे महिन्याभरापूर्वीच जाहिर केले होते. हे लॅण्डींग जरी टेस्टींगसाठी असले तरी सिंधुदुर्ग भूमीवर पहिल्यांदाच विमान लॅण्डींग होणार असल्याने त्याच्या स्वागतासाठी हा ‘इव्हेन्ट’ करायचा अशी तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना या सोहळ्यासाठी निमंत्रीत करण्याचे जाहीर झाले. भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. श्रेय्यवाद यातूनच सुरू झाला होता. भाजपाला या विमानतळाचे संपूर्ण श्रेय शिवसेनेला द्यायचे नव्हते. त्यासाठी भाजपची धडपड सुरू झाली होती, असे सांगण्यात येत होते.त्यातूनच भाजपच्या कोकण संघटन वाढीची जबाबदारी घेतलेल्या आ. प्रसाद लाड यांनी ‘असे कोणतेही विमान लॅण्डींग होणार नाही’ असे जाहीर करून टाकल होतेे. विमान वाहतूक खात्याचे मंत्री सुरेश प्रभू आहेत. त्यांच्या मंत्रालयाने आवश्यकत्या सर्व परवानग्या दिल्याशिवाय विमान लॅण्ड होणार नाही, अशी पुष्टीही आमदार लाड यांनी जोडली होती. अर्थात लाड यांचेच वक्‍तव्य खरे ठरले. पालकमंत्री दीपक केसरकर आणि खा. राऊत यांनी एक पाऊल मागे घ्यावे लागले होतेे. अप्रत्यक्षरित्या गणेशोत्सवापूर्वी विमान उतरणार नाही, हे त्यानी स्पष्ट केले होते. त्याचवेळी आपण दिल्लीला जावून सुरेश प्रभू यांची भेट घेवू आणि 12 सप्टेंबर रोजीच लँडींग होईल यादृष्टीने आवश्यक त्या परवानग्या आणू असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शुक्रवारी पालकमंत्री यांनी पत्रकारांना ही माहिती दिल्यानंतर शनिवारी त्यांनी दिल्ली गाठली. शनिवारी, रविवारी या दोन दिवसात त्यांनी  अर्थातच केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली, संबंधित अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि एकदाचे ट्रायल लँडिंगची परवानगी मिळविण्यास यश मिळविले.सत्तेत एकत्र असलेले शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. चिपी विमानतळ उद्घाटनावरून श्रेय्य मिळविण्यासाठीही दोन्ही पक्षांची धडपड सुरू होती. पालकमंत्री केसरकर आणि खा. विनायक राऊत यांचे म्हणणे आहे की, ‘केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीच आपणास 12 सप्टेंबरला विमान लॅण्ड होईल’ त्या दृष्टीने आवश्यक ती तयारी करा असे सांगितले होते, त्यामुळे आम्ही असे जाहीर केले. अलिकडेच स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी पडवे येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या निमंत्रणावरून आपण 12 सप्टेंबर रोजी विमानतळावर उपस्थित राहणार असे जाहीर केलेच होते. आता केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू रशियाच्या दौर्‍यावर आहेत. परदेश दौर्‍यावर असल्यामुळे जेव्हा बुधवारी विमान लँडींग होणार  त्या क्षणाला ना. प्रभू उपस्थित राहणार नाहीत. पालकमंत्र्यांनी या विमानाच्या स्वागतासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे म्हटले आहे. त्यामुळे ज्या विमानाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे अशी अपेक्षा आहे.  कोकणच्या आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात राजकारण आणि त्यातील श्रेय्यवाद नेहमी आडवा येत राहिला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात निवडणूकांमध्ये तेथील राजकीय नेते कितीही भांडले तरी विकासाच्या मुद्यावर एकत्र येतात. कोकणातीलही सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते विकासाच्या प्रकल्पासाठी एकत्र येतात हा संदेश महाराष्ट्रभर देण्याची ही एक संधी आहे आणि ही संधी गमावली जावू नये ही अपेक्षा आहे.

12 सप्टेंबर रोजी होणारे विमानाचे लँडिंग हे ट्रायल लँडिंग असणार आहे. त्यानंतर सर्व परवानग्या वेळेत मिळाव्या आणि विमान वाहतूक सेवा नियमितपणे सुरू व्हावी, एवढेच नव्हे तर ती कायमस्वरूपी टिकावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. गेल्या 19 वर्षात प्रत्येक सत्ताकाळात प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्यापरीने हे विमानतळ पुर्णत्वाकडे जावे यासाठी प्रयत्न केले. सध्याच्या सरकारने आणि पालकमंत्री दीपक केसरकर व खा. विनायक राऊत यांनी जातीनिशी या विमानतळावरून विमान टेकऑफ व्हावे यासाठी कसोशिने प्रयत्न केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री आणि खासदार शिवसेनेचे आहेत. अगदी ज्या शासकीय यंत्रणेने या विमानतळासाठी जमीन उपलब्ध करून दिली, इतर सुविधा दिल्या त्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ज्या खात्याच्या ताब्यात आहे त्या उद्योग खात्याचे मंत्री सुभाष देसाई हेही शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे हा विमानतळ सुरू करण्यात शिवसेनेच्या मंत्र्यांना पुढाकार असणे स्वाभाविक आहे. पण शिवसेनेने त्याचवेळी भाजपला सोबत आणि विश्‍वासात घेणे आवश्यक आहे. अगदी खा. नारायण राणे यांनाही विश्‍वासत घेतले असते तर बिघडले नसते. या विमानतळाचा संकल्प आणि भूमीपूजन राणे यांनीच केले. त्यासाठी 271 हेक्टर जागा संपादित केली. स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध पत्करला. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी इतकी जमीन संपादित करून अनेक गावातील मतदारांचा रोष आणि विरोध पत्करण्याचे राजकीय धाडस सोपे नसते. ते खा. राणे यांनी दाखविले हे विसरून चालणार नाही.