Mon, Aug 10, 2020 05:02होमपेज › Konkan › चिपळुणात शिवनदीचा श्‍वास कोंडतोय

चिपळुणात शिवनदीचा श्‍वास कोंडतोय

Last Updated: Feb 08 2020 8:39PM
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

शहाराच्या मध्यभागातून वाहत जाणारी शिवनदी दिवसेंदिवस आकुंचन पावत आहेत. पावसाळ्यात शहारात येणारा पूर शिवनदीचे पात्र कमी कमी होत असल्याने बाजारपेठेला पुराचा धोका पोहचत आहे. त्यासाठी नगर प्रशासनाने वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. शिवनदी चोकअप झाली, तर व्यापार्‍यांची झोप उडणार आहे.  

चिपळूण शहराला वाशिष्ठी आणि शिवनदीने वेढलेले आहे. वाशिष्ठीचा उगम सह्याद्रीच्या खोर्‍यात होतो. ही नदी पूर्व विभागातून वाहत येऊन चिपळूण शहारातून गोवळकोटला वेढा देऊन पुढे दाभोळ खाडीला मिळते. या नदीमध्ये कोयनेचे अवजल बारा महिने खाडीला जाऊन मिळते. शिवाय, पावसाळ्यात डोंगर उतारावरून येणारे पाणी या नदीला मिळते. कोयनेचे अवजल आणि समुद्राला येणारी भरती एकाचवेळी आली की  चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरते. मात्र या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरात शिवनदीचा मोठा उपयोग करून घेता येणे शक्य आहे. 

शहरालगतच्या कामथे येथे शिवनदीचा उगम होतो. ही नदी कापसाळ, चिपळूण मार्गे  वाहत शहरातील खाटिकआळी येथे वाशिष्ठीला मिळते. मात्र शहरातून वाहणार्‍या शिवनदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत आहे. पागमळा भागापासून ही नदी अरुंद होत आहे. नदीलगत झाडे झुडपे वाढली असून नदी पात्राच्या दोन्ही बाजूला गाळ साचलेला आहे. भोगाळे भागात देखील अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने गाळ साचत आहे. चिंचनाका परिसरात असणारे भाजी विक्रेते नदीपात्रात सडकी भाजी टाकत असून नदीमध्ये घाण साचून राहिली आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरत आहे. 

शहरातील अण्णा साहेब खेडेकर क्रीडा संकुलाला वळसा घालून शिवनदी जोग गिरणी जवळून खाटिक गल्लीकडे जाते. मात्र क्रीडा संकुलाच्या मागे नदीचे पात्र अरुंद बनले आहे. जोग गिरणीपासून पुढे या नदीपात्रावर भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. नव्या भाजी मंडईसमोरही नदीचे पात्र चिंचोळे झाले असून पावसाळ्यात येणारे जादा पाणी या पात्रातून वाहून जाऊ शकत नाही.

 दरवर्षी पालिकेच्या वतीने पावसाळयापूर्वी गाळ काढला जातो. मात्र नदीच अरुंद झाल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि पुराचे  पाणी शहरात शिरते. यावर्षी शहरात 14 वेळा पुराचे पाणी शिरले. यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले.

बाजारपुलानंतर पुराची तीव्रता कमी

नवीन बाजारपूल बांधल्यानंतर आणि फरशी येथील जुनी फरशी तोडल्यानंतर पुराची तीव्रता कमी झाली आहे. अनेकदा फक्त बाजारपुलावरून पाणी गेल्याचे निदर्शनात आले आहे. मात्र अलीकडे शिवनदी चोकअप होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना पुराचा धोका वाढणार आहे. पालिकेने शिवनदीचे पात्र मोकळे करणे काळाची गरज बनले आहे. अन्यथा शहरातील व्यापार्‍यांना पावसाळ्यात रात्री जागून काढाव्या लागतील अशी परिस्थिती आहे.