Sun, Aug 09, 2020 11:38होमपेज › Konkan › ‘रायगड’ राखण्याचे गीतेंपुढे आव्हान

‘रायगड’ राखण्याचे गीतेंपुढे आव्हान

Published On: Mar 07 2019 2:02AM | Last Updated: Mar 06 2019 10:28PM
चिपळूण : प्रमोद पेडणेकर

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे व युतीचे अनंत गीते यांच्यातच सरळ लढत होणार आहे. आचारसंहितेपूर्वीच या दोन्ही उमेदवारांनी थेट जनसंपर्कावर भर दिला आहे. या मतदारसंघातून सातत्याने यशाच्या पुनरावृत्तीचे आव्हान अनंत गीते यांच्यासमोर असून रायगड यंदा काबीज करायचा या इराद्याने सुनील तटकरे यांनी रणनीती आखली आहे.

तब्बल सहावेळा अनंत गीते शिवसेनेकडून निवडून जात आहेत. पूर्वीच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातही शिवसेनेने दबदबा कायम ठेवला होता. या दबदब्याला 2009 च्या निवडणुकीत प्रथमच सुरूंग लावण्याचा तटकरेंचा प्रयत्न असफल झाला. 2009 च्या निवडणुकीत गुहागरपासून अलिबागपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण मतदारसंघात अनंत गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मते मिळाली तर सुनील तटकरे यांना 3 लाख 94 हजार 68 मते मिळाली. जेमतेम दोन हजाराच्या फरकाने तटकरे पराभूत झाले असले तरी आपला हा नैतीक विजय समजून गेली पाच वर्षे ते मतदारसंघात सक्रिय आहेत. 

2019च्या निवडणुकीची रणनीती तटकरे यांनी पाच वर्षांपासूनच आखण्यास सुरुवात केली होती. त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो. तटकरे यांची जमेची बाजू म्हणजे, या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक तीन आमदार भास्कर जाधव, संजय कदम व अवधूत तटकरे यांच्या रूपाने त्यांच्याकडे आहेत. अलिबाग व पेण येथे शेकाप पक्षाचे पंडीत पाटील व धैर्यशिल पाटील या दोन आमदारांची रसद त्यांना मिळू शकते. याउलट गीते यांच्याकडे केवळ महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांचीच साथ असणार आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेचे मजबूत संघटन व भाजपची साथ गीते यांची जमेची बाजू आहे. गुहागरपासून अलिबागपर्यंत शिवसेनेचे खोलवर असलेले जाळे शिवाय मागील निवडणुकीत गीते यांना अंतर्गत बेबनावाचा फटका बसला होता. यावेळी मात्र अंतर्गत बंडाळीचे आव्हान गीते यांच्यासमोर नसणार आहे. शिवाय दापोली, खेड, मंडणगडमधून गीते यांना मोठे मताधिक्य देण्याची सिद्धता रामदास कदम यांनी केली आहे. 

गीते व तटकरे ही लढत सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरणार आहे. गीते यांचा कुणबी फॅक्टर मजबूत राहिलेला नाही. केंद्रात लोकांशी संबंध नसलेले कमी महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद गीते यांच्या वाट्याला आले. त्यामुळे अपेक्षा मोठ्या असल्या तरी त्याची पूर्तता करण्यास आलेले अपयश या कमजोर बाबी आहेत. तरी गेल्या पंधरा दिवसांत गीते यांनी केंद्रीय कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडातून प्रत्येक तालुक्याला अद्ययावत रुग्णवाहिकांचे वाटप केले. अपंगांसाठी मोटारसायकली दिल्या, सभा घेतल्या. यातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याउलट, गीते निष्क्रीय आहेत, अशी भूमिका तटकरे यांनी घेतली आहे. पक्षात कोणीही नाराज राहाणार नाही याचीही त्यांनी दक्षता घेतली आहे. युती असताना व मोदी यांची लाट असतानाही 2014 मध्ये तटकरे यांनी गीते यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी रायगड काबीज करायचा इरादा पक्का दिसतो. तटकरे यांनी यावेळी गीतेंसमोर मजबूत आव्हान उभे केले आहे.