Mon, Aug 10, 2020 04:54होमपेज › Konkan › कोकणात पुन्हा राणे विरूध्द शिवसेना यांच्यात लढाई!

कोकणात पुन्हा राणे विरूध्द शिवसेना यांच्यात लढाई!

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:05PMराजकीय विशेष : गणेश जेठे

विधान परिषदेच्या कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.नारायण राणे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला जिंकू द्यायचे नाही, असा आपला इरादा त्यांनी जाहीर केल्यानंतर कोकणात या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राणे विरूध्द शिवसेना अशी लढाई लढली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 212 मतांपैकी 103 मते स्वाभिमान पक्षाची असल्यामुळे ही मते निवडणूक निकालासाठी मोलाची ठरणार आहेत. अर्थात या संपूर्ण मतदारसंघात भाजपची भुमिका काय असेल यावरच शिवसेनेचे राजीव साबळे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

खा. राणे यांनी दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पारंगवार या गावाला भेट दिली होती. या भेटीत राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांनी राणे यांची भेट घेवून चर्चा केली. अर्थातच पाठिंबा मागितला. राणे यांनी तो देवू केला, त्याबरोबरच शिवसेनेला कोकणात नामोहरण करण्याचा इरादा स्पष्ट केला. परिणामी शिवसेना खवळली नाही तर नवलच. शिवसेनेने राणे यांनी तटकरेंच्या बाजूने ताकद उतरावयचे जाहीर केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला तटकरे यांना पराभूत करून राणे यांना शह द्यायचा आहे. त्यामुळे या लढतीला वेगळीच रंगत आली आहे.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिल तटकरे हेच विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे अनिल तटकरे हे भाऊ आहेत. आता सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा आपल्याच घराण्यातील अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी काँग्रेसचे मन वळविण्यात यश मिळविले आहे. काँग्रेसची मते फारशी नाहीत परंतु ती निर्णायक ठरू शकतात असे राजकीय निरीक्षकांना वाटते आहे. शिवसेनेने रायगड जिल्ह्यातील अ‍ॅड. राजीव साबळे यांना निवडणूक आखाड्यात उतरविले आहे. या मतदारसंघात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वांत जास्त रायगड जिल्ह्यात 469, रत्नागिरी जिल्ह्यात 259 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 212 इतके मतदार आहेत. परिणामी गेल्या अनेक निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत रायगडचेच वर्चस्व आहे.  त्यामुळे तटकरे आणि साबळे या दोन रायगड सुपूत्रांमधील लढतीचे केंद्रही रायगड येथेच आहे. आता राणे यांनी पाठिंबा जाहीर करून तटकरे यांच्या बाजूने सिंधुदुर्गची फौज उभी केली आहे. 

सिंधुदुर्गात 212 मतदारांपैकी जिल्हा परिषदेचे 27 सदस्य, कणकवली, सावंतवाडी, मालवण या पंचायत समित्यांचे 3 सभापती, नगरपालिकांचे 66 नगरसेवक आणि 7 स्वीकृत नगरसेवक असे मिळून 103 इतके मतदार राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आहेत. शिवसेनेकडे जि.प. सदस्य 16, वेंगुर्ले-दोडामार्ग-कुडाळ या पंचायत समित्यांचे 3 सभापती, नगरपालिकांचे 31 नगरसेवक  व स्वीकृत नगरसेवक असे मिळून 49 च्या वर मतदार आहेत. भाजपकडेही 6 जि.प. सदस्य, देवगड आणि वैभववाडी या 2 पंचायत समित्यांचे सभापती, 31 नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक मिळून 39 च्या वर मतदार संख्या आहे. 

21 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मतदान केंद्रे आहेत आणि 24 तारखेला मतमोजणी आहे. संपूर्ण मतदारसंघात एकूण 940 इतके मतदार आहेत. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सर्वांत जास्त  279 शिवसेनेकडे आहेत. त्यानंतर भाजपकडे 143 इतके मतदार आहेत. राष्ट्रवादीकडे 167, शेकापकडे 76, मनसेकडे 13, काँग्रेसकडे 60 आणि अपक्षांकडे 23 इतके मतदार आहेत. या मतदारसंघात शिवसेना-भाजप युती असल्याचे मानले जाते. त्यामुळे युतीकडे 422 आणि काँग्रेस आघाडीकडे 227 इतके मतदार आहेत. अनिकेत तटकरे यांना विजयापर्यंत पोहोचण्यासाठी शेकाप, मनसे आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. ही मते मिळाली तरी देखील विजयासाठी  कसरत करावी लागेल.

मतांच्या संख्येचे गणित मांडले गेले तर अनिकेत तटकरे यांच्यासाठी ही लढाई कठीण आहे. परंतु भाजप- शिवसेनेसोबत मनापासून राहील का? की पालघरच्या लढाईचा प्रभाव या निवडणुकीत पडेल?, मनसे, शेकाप आणि अपक्ष यांची किती मते तटकरे यांना मिळतील यावरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

खोपोली नगराध्यक्ष दत्ता मसुरकर आणि माजी आ.अनिल तटकरे या ज्येष्ठांना बाजूला ठेवून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या फॅक्टरचाही प्रभाव काही अंशी या निवडणूक निकालावर पडू शकतो. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे फार प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आपली सर्व प्रतिष्ठा आणि ताकद ते पणाला लावतील यात शंका नाही. बुधवारी सुनील तटकरे यांनी सिंधुदुर्गात येत खा. नारायण राणेंची भेट घेतली तसेच आयोजित बैठकीत मतदार सदस्यांना मार्गदर्शनही केले. अशाप्रकारे सिंधुदुर्गातून राणे यांची ताकदही त्यांना मिळाली असल्यामुळे यशाचे गणित मांडण्यात राणे आणि तटकरे यशस्वी ठरतील असे म्हटले जाते, मात्र त्याचवेळी शिवसेना-भाजप युती घट्ट आणि प्रामाणिक राहीली तर मात्र साबळेसुध्दा बाजी मारू शकतात असे चित्र आहे. शिवसेनेला ही जागा जिंकण्यासाठी तशी पोषक परिस्थिती आहे. त्यासाठी केंद्रीयमंत्री अनंत गीते, खा.विनायक राऊत, मंत्री रामदास कदम या शिवसेनेच्या नेत्यांनाही या लढाईसाठी निश्‍चितपणाने प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईलच, त्याशिवाय निवडणूक निकालानंतरचे कवित्वही अधिक रंगतदार असेल.

पैसा होईल मोठा?

गेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान पैशाच्या वापराची चर्चा झाली होती. काही मतदारांपर्यंत पैसे पोहोचविण्यात आले असे सांगण्यात येते. वाटपाची जोरात चर्चा सुरू होती. या निवडणुकीतही पैशाचा वापर होण्याची शक्यता आहे. अनेक मतदार मतदान करताना पैसा महत्त्वाचा मानणार नाहीत असे सांगितले जाते. पक्ष जो आदेश देईल त्यालाच मतदान करायचे अशी भूमिका घेतली जाईल असेही सांगितले जाते, मात्र काही मतदार पैशाच्या प्रभावाखाली येवू शकतात आणि यातूनच पैशाचा वापर होवू शकतो असाही अंदाज बांधला जात आहे. पैशाचा वापर झाला आणि त्यानुसार निकाल बाहेर पडला तर ‘पैसा झाला मोठा’ असेच म्हणावे लागेल.