Tue, Jun 15, 2021 12:00होमपेज › Konkan › चिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन

चिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 10:46PMसिंधुदुर्ग : गणेश जेठे

अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी-परूळे माळरानावर आयआरबी कंपनीने उभारलेल्या देखण्या विमानतळावर बुधवारी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी चक्‍क आयआरबी कंपनीचा गणपती बाप्पा खास विमानाने उतरणार आहे. या ट्रायल लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या भारतीय विमान प्राधिकरणने दिल्या आहेत. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा. आयआरबी कंपनीचे 12 सीटरचे विमान काही ठराविक तंत्रज्ञ व अधिकार्‍यांसह श्रीगणेशाची मूर्ती घेऊन अडीच कि.मी. लांबीच्या धावपट्टीच्या लँड होणार आहे. हा क्षण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार हे निश्‍चित आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन दिवसांत दिल्लीत जाऊन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री आणि सिंधुदुर्ग सुपुत्र ना. सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली. संबंधित अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्या. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अखेर विमान लँडिंगचा मूहूर्त निश्‍चित केला. तब्बल 19 वर्षांपूर्वी या माळरानावर तत्कालीन मुख्यमंत्री, सिंधुदुर्ग सुपुत्र सध्याचे खा. नारायण राणे यांनी या विमानतळाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळीही केंद्रात मंत्री असलेले सुरेश प्रभू उपस्थित होते. तिथपासून सिंधुदुर्गवासीयांनी पाहिलेले स्वप्न तब्बल 19 वर्षांनी पूर्ण होत आहे. नेमक्या याचवेळी सुरेश प्रभू हे विमान वाहतूकमंत्री असणे हा एक सुयोग आहे.

271 हेक्टर जमिनीवर सागरी महामार्गाला लागून हा विमानतळ उभारण्यात आला आहे. तब्बल 11 इमारती या परिसरात आहेत. विमानतळाचे प्रवेशद्वार आणि परिसर खूपच सुंदर बनविण्यात आला आहे. आयआरबी कंपनीचे तंत्रज्ञ विमानतळ सज्ज ठेवण्यासाठी राबत आहेत. विमानतळ प्राधिकरणचे तंत्रज्ञही विमानाच्या स्वागतासाठी सर्व तयारीशी सज्ज आहेत. बरोबर 10.30 वा. आयआरबी कंपनीचे विमान मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गच्या दिशेने झेपावणार आहे. मुंबई-गोवा या हवाई मार्गे हे विमान चिपीकडे निघणार आहे. आयआरबी या कंपनीने या विमानतळाला तूर्त आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळ असे नाव दिले आहे. आता या विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. भविष्यात ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. 

95 वर्षांच्या कराराने 271 हेक्टर जागेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आयआरबी या कंपनीला दिले आहे. 520 कोटी रूपये खर्च करून आयआरबी कंपनीने हे विमानतळ बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर उभारले आहे. पुढील दोन महिन्यांत आवश्यक त्या आणखी परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी एकत्रित येवून 12 सप्टेंबर रोजी उतरणार्‍या विमानाचे स्वागत करावे, असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. हे विमान उतरणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.

12 सप्टेंबर रोजी उतरणार्‍या विमानाने मुख्यमंत्री व इतर व्हीआयपी यांचे आगमन होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. पण अशा व्हीआयपींना घेवून उतरण्यास प्राधिकरणने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, या विमानाने व्हीव्हीआयपी असणारा गणपती बाप्पा मात्र निर्विघ्नपणे उतरणार आहे.  या गणपतीची प्रतिष्ठापना आयआरबी कंपनी विमानतळावरच करणार असून त्याची पूजा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

या विमानतळामुळे सिंधुदुर्गाच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून गोव्यापेक्षाही या विमानतळावर चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहे  पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत याच्यासह आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेची सर्व टिम उपस्थित राहणार आहे. या लँडिंग टेस्ट नंतर नियमित प्रवासी वाहतुकीकरिता पुढील प्रक्रिया सुरू होवून पुढील दोन महिन्यात  आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळावरून नियमित प्रवास वाहतूकीचा मार्ग सुकर होईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.