Wed, Aug 12, 2020 09:43होमपेज › Konkan › जिल्ह्यातील आणखी एकजण कोरोनामुक्त

जिल्ह्यातील आणखी एकजण कोरोनामुक्त

Last Updated: May 11 2020 1:36AM

जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षातील छायाचित्रसिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील दुसरा कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. कोरोनाबाधित युवतीचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रविवारी जिल्हा रुग्णालयातून तिला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्हा रुग्णालयात दोन कोरोना रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. 

कोरोना या जागतिक महामारीचे सिंधुदुर्गातही आता रुग्ण सापडू लागले आहेत. जिल्ह्यात 26 मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता.  त्यानंतर 3  एप्रिल रोजी त्याचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला 9 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर 29 एप्रिल रोजी जिल्ह्यातील दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 17 वर्षीय युवतीच्या स्वरूपात  जी मुंबईहून आली होती तो मिळाला होता. ही युवती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. ही युवती आता पूर्णपणे ठीक झाली असून, तिला रविवारी तिच्या घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात येण्यासाठी 18 हजार 941 व्यक्ती इच्छुक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमधून 11 हजार 909 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर इतर राज्यांमधून 1 हजार 533 व्यक्तींनी मिळून एकूण 18 हजार 941 व्यक्तींनी नोंद केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाण्यासाठी 11 हजार 909 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. राज्याबाहेर जाण्यासाठी 14 हजार 818 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. परराज्यात जाणार्‍या व्यक्तींनी त्यांच्या संबंधित राज्याच्या लिंकवर जाऊन नोदणी करून पास प्राप्त करुन घ्यावयाचा आहे. त्या अनुषंगाने पास मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये एसएमएसच्या माध्यमातून संबंधित राज्यांच्या लिंकची माहिती कळवली आहे. 

जिल्ह्यात परतण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून 17 हजार 408 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तीची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविले आहे. 

परराज्यातून जिल्ह्यात परतण्यासाठी 1 हजार 533 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमधून मिळून 663 व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 891 व्यक्ती अलगीकरणात

जिल्ह्यात एकूण 891 व्यक्ती अलगीकरणात असून 597 व्यक्तींना गृह अलगीकरणात, तर 294 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 770 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 708 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 4 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 704 अहवाल निगेटिव्ह आले आहेत; तर अजून 62 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात 64 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आजवर 4512 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.