Sat, Dec 05, 2020 02:03होमपेज › Konkan › वाडेकरांचा ‘तो’ षटकार रत्नागिरीकरांसाठी अविस्मरणीय

वाडेकरांचा ‘तो’ षटकार रत्नागिरीकरांसाठी अविस्मरणीय

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 8:29PMरत्नागिरी ः क्रीडा प्रतिनिधी

सन 1970 मध्ये रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा मैत्रीपूर्ण क्रिकेटचा सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात अजित वाडेकर यांनी कॉलेजच्या इमारतीवरील घड्याळावर सांगून मारलेला षटकार आणि क्रिकेटरसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना दिलेली दाद. हा क्षण तो सामना पाहणारे रत्नागिरीकर तो क्षण कधीच विसरू शकणार नाहीत. या आठवणीला  रत्नागिरीतील ज्येष्ठ क्रिकेटपटू दीपक देसाई यांनी उजाळा दिला.

भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे गत बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी वाडेकरांनी अखेरचा श्‍वास घेतला. वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौर्‍यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. गुजरात विरुद्धच्या त्या सामन्यानंतर काही कालावधीतच अजित  वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा वेस्टइंडिज दौरा सुरू झाला व भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच परदेशात वेस्ट इंडिज संघाविरुद्ध मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम भारतीय क्रिकेट संघाने केला. त्यानंतर लगेचच इंग्लंड दौर्‍यात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला त्यांच्या भूमीत हरवून मालिका जिंकून सार्‍या क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले व भारतीय संघाचा विजय होण्याचा श्रीगणेशा त्यानंतर सुरु झाला. 

वाडेकर यांची क्रिकेट कारकीर्द सर्वश्रुत आहे. परंतु त्यांचे मनमिळावू स्वभावाला तसेच साध्या राहणीला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. कारण काही वर्षापूर्वी कै. शिरीष जैतपाल यांनी आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलाविले होते. कोणतेही आढेवेढे न घेता ते बक्षीस समारंभाला हजर राहिले.  त्यांना रत्नागिरीबद्दल फारच आकर्षण असल्याचे सांगतानाच देसाई म्हणाले की, त्यांना इथला निसर्ग फार आवडायचा. रत्नागिरीतील डॉ. अनिल बिर्जे यांच्याशी त्यांचे घरगुती संबंध. गणपतीपुळे, पावस ही त्यांची आवडती ठिकाणे. रत्नागिरीत आल्यावर मालगुंडच्या सुनील मयेकरांना घेऊन गणपतीपुळे समुद्रावर लाँचमधून फेरफटका मारण्याची त्यांना दांडगी हौस होती. गतवर्षी डॉ. अनिल बिर्जे यांच्या प्रयत्नाने त्यांना मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या 16 वर्षांखालील अंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी रत्नागिरीत आणण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, नाताळच्या सुट्टीमुळे त्यांना येता आले नाही. पुढील वर्षी कोणत्याही परिस्थितीत स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी येण्याचा शब्द दिला होता. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. वाडेकर आता येणार नाहीत याची खंत राहील, असेही देसाई म्हणाले.