Fri, Nov 27, 2020 11:34शाळेची घंटा आज वाजणार

Last Updated: Nov 23 2020 2:06AM
सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने अनुमती दर्शवली आहे. याबाबत शिक्षण विभाग, शाळा व शिक्षण संस्था अलर्ट झाल्या आहेत. परंतु, योग्य नियोजनाच्या अभावामुळे शाळा सुरू करण्यावरून अजूनही संभ्रमावस्था असल्याची स्थिती आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, अशी शासनाची भूमिका आहे. याचाच दुसरा अर्थ असा निघतो की शासन विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाही. परंतु, जिल्ह्यात अलीकडच्या काही दिवसांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शाळांमधील व्यवस्थापन सक्षम आहे का? हा खरा प्रश्‍न आहे. 

दरम्यान, 100 टक्के शिक्षकांच्या कोव्हिड चाचण्या पूर्ण झाल्या असून, यातून केवळ 2 शिक्षक पॉझिटिव्ह निघाले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. जूनपासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले नाही. ऑक्टोबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने माध्यमिक ते कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याची संपूर्ण जबाबदारी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या हाती सोपविण्यात आली आहे. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्यातरी विद्यार्थ्यांना पालकांच्या लेखी संमतीपत्राशिवाय शाळेत प्रवेश नाही. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा बंधनकारक नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाच्या समितीने वर्तविली आहे. त्यानुसार दिल्ली, मुंबई येथे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने शाळा सुरू करण्याचा हा धाडसी निर्णय होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया पालकवर्गातून निर्माण होत आहे. 

23 पासून शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर 247 शाळांमधील अध्यापन करणार्‍या 2200 शिक्षक वर्गाची कोविड तपासणी करण्यात आली असून त्यापैकी केवळ 2 शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर या शाळांमध्ये शिक्षण घेणारा 40 हजार विद्यार्थी वर्ग असून यापैकी किती विद्यार्थी शाळेत हजेरी लावतात हे पाहण्याजोगे होईल.

दरम्यान काही शाळांना शिक्षकांचा कोरोना तपासणी अहवाल प्राप्त न झाल्याने अशा शाळा व्यवस्थापनानी सोमवारपासून शाळा न सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कुडाळ व पणदूर हायस्कूलने आपल्या विद्यार्थ्यांना व्हॉटस् अ‍ॅप द्वारे तसा संदेश पाठविला आहे. तर मडुरा गावातील पालकांनीच कोरोनाचे भय संपेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

पालकांमध्ये संभ्रम

कोरोना काळात शिक्षणाची गाडी रुळावर यावी यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांवर टाकली गेली आहे. शाळा सुरू झाल्यावर एखाद्या विद्यार्थ्याला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न पालकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सध्या पालकही आपल्या मुलाला शाळेत पाठवावे की नाही या द्विधा मन:स्थितीत आहेत.