Sat, Oct 31, 2020 10:30होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात सेवा बजावलेल्या 4 महसूल अधिकार्‍यांची ‘आयएएस’पदी बढती

सिंधुदुर्गात सेवा बजावलेल्या 4 महसूल अधिकार्‍यांची ‘आयएएस’पदी बढती

Last Updated: Sep 04 2020 10:38PM
सिंधुदुर्ग ः पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी सेवा बजावलेल्या चार महसूल अधिकार्‍यांना केंद्र सरकारने ‘आयएएस’ म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा या पदावर बढती दिली आहे. यामध्ये किशोर तावडे, सिद्धराम सालीमठ, शामसुंदर पाटील आणि प्रवीण पुरी या अधिकार्‍यांचा समावेश आहे. 

आयएएस (बढतीवर नियुक्‍ती) कायदा 1955 नुसार केंद्र सरकारने हे बढतीचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारचे सचिव पंकज गंगवार यांनी महाराष्ट्रातील 23 राज्य लोकसेवेच्या अधिकार्‍यांना ही बढती दिली आहे. यामध्ये किशोर तावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली होती. त्यांचा या यादीत समावेश आहे. प्रवीण पुरी यांनी कणकवलीचे तहसीलदार म्हणून सेवा बजावली होती. नंतर ते प्रांताधिकारी पदावर कार्यरत होते. सिद्धराम सालीमठ हे कणकवलीला सुरुवातीच्या काळात प्रांताधिकारी म्हणून काम करत होते. त्यानंतर काही काळ त्यांनी सावंतवाडीतही प्रांताधिकारी म्हणून सेवा बजावली होती. शामसुंदर पाटील हे अत्यंत लोकप्रिय प्रांताधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली. कणकवलीचे प्रांताधिकारी म्हणून ते काम करत होते. 1995 मध्ये आलेल्या युती सरकारच्या काळात ते जिल्ह्यात सेवेत होते. 

हे चारही अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महसूल प्रशासनात ठसा उमटवून बदली होऊन गेलेले आहेत. त्यांची कामाची पद्धत आणि त्यांनी केलेले काम आजही सिंधुदुर्गवासीयांच्या मनात आहे. त्यांना बढती मिळाल्यामुळे सिंधुदुर्गवासीयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग माझा आवडता जिल्हा ः सालीमठ

सिद्धराम सालीमठ यांनी या बढतीनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा माझा आवडता जिल्हा आहे. या जिल्ह्यात दोनवेळा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खूप काही शिकता आले. प्रोबेशन कालावधीतील सेवासुद्धा मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बजावली याचा आनंद आहे.

 "