होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात 100 टक्के मतदान

रत्नागिरी जिल्ह्यात 100 टक्के मतदान

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:06PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात 100 टक्के मतदान झाले. तिन्ही जिल्ह्यांमधील एकूण 16 मतदान केंद्रांपैकी रत्नागिरी, दापोली, राजापूर, चिपळूण, खेड या पाच मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 259 पैकी 259 मतदारांनी मतदान हक्‍क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 24 मे रोजी सकाळी 8 वा. येथील अल्पबचत सभागृहात मतमोजणी होणार आहे.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या किंवा कोकण स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगरसेवक,  नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे मतदार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड. राजीव साबळे आणि राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्यात थेट लढत आहेत. प्रलोभनामुळे मतदारांमध्ये फूट पडू नये, यासाठी शिवसेनेच्या मतदारांना चार दिवसांपूर्वीच रम्यस्थळी फिरण्यास नेण्यात आले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आपआपल्या मतदारांना थंड हवामानाच्या ठिकाणी फिरण्यास पाठवले होते. हे सर्व मतदार सोमवारी मतदानाच्या दिवशी आपआपल्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केल्यानंतरच घरी गेले. यावेळी शिवसेनेच्या मतदारांना कुटुंबाला सोबत नेण्याची मुभा देण्यात आली होती.

सोमवारी संध्याकाळी 4 वाजता मतदान प्रक्रिया संपली. यामध्ये रत्नागिरी प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर 71 पैकी 71, दापोली 48 पैकी 48, राजापूर 49 पैकी 49, चिपळूण 63 पैकी 63 आणि खेड प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावरही पैकीच्या म्हणजे 28 पैकी 28 मतदारांनी आपला हक्‍क बजावला.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार असून, प्रथम सर्व मतपत्रिकांची मोजणी करुन त्यातील 25-25 मतपत्रिकांचे गठ्ठे केल्यानंतर त्याची मतमोजणी सुरु होणार आहे. पुढील दोन तासात म्हणजे 10 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.

तीन जिल्ह्यांपैकी रायगडमध्ये सर्वाधिक मते असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी या जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी उपस्थिती लावली. सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे उपस्थित होते. रत्नागिरीत मात्र दोन्ही उमेदवारांच्यावतीने प्रमुख नेत्यांपैकी कुणीच उपस्थित नव्हते.