Thu, Sep 24, 2020 08:34



होमपेज › Kolhapur › घर वाचवण्यासाठी ९ वर्षापासून धडपड

घर वाचवण्यासाठी ९ वर्षापासून धडपड

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:18PM



कोल्हापूर: प्रतिनिधी

ज्या ग्रामपंचायतीने बांधकामाचा परवाना दिला, त्याच ग्रामपंचायतीला अचानक 18 वर्षानंतर जागा अतिक्रमीत असल्याची आठवण होते, घराच्या जागा उतार्‍यावर परस्पर बदल केले जातात, अतिक्रमीत जागेवरील घर पाडण्याची नोटीस लागू होते. अचानक झालेल्या या प्रकाराने हतबल झालेला एक ज्येष्ठ नागरीक गेली 9 वर्षे आपले घर वाचवण्यासाठी प्रशासकीय कार्यालयांच्या पायर्‍या झिजवत आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यापर्यंत अर्ज, विनंत्या केल्या, न्यायालयाचेही दार ठोठावले, पण कागदी घोडे नाचवण्यापलिकडे शासनाकडून कांही झाले नाही. 

या सर्व व्यवस्थेला वैतागलेल्या शाहूवाडी तालुक्यातील सवते येथील मधूकर शिंदे या ज्येष्ठ नागरीकाने आता गांधीमार्गाचा अवलंब करत जिल्हा परिषदेसमोरच उपोषणाची घोषणा केली आहे, दरम्यान 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून न्यायासाठी टाहो फोडण्याआधी त्यांनी राज्याचे ग्रामविकास सचिव असिम गुप्‍ता यांच्याकडे पुन्हा एकदा आपली कैफीयत निवेदनाद्वारे मांडली आहे. दरम्यान मंत्रालयात ही तक्रार पोहचताच जिल्हा परिषदेची यंत्रणा हालली असून यासंदर्भात बुधवारी दुपारी चार वाजता सुनावणी घेण्याचे पत्र काढले आहे. स्वत: जि.प सीईओ सुनावणी घेणार असून यातून कांही निष्पन्‍न झाले नाही तर उपोषण सुरु करणार असल्याचे शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले. 

सवते येथून मधूकर शिंदे यांनी 23 बाय 23 या जागेवर ग्रामपंचायतीच्या परवानगीने 1993 मध्ये घर बांधले. 1994 साली त्याची किंमत ठरवून त्याप्रमाणे घरफाळाही भरण्यास सुरुवात झाली. दरम्यान 24 ऑक्टोबर 2011 मध्ये या जागेच्या उतार्‍यात खाडाखोड करुन 23 बाय 23 ऐवजी 23 बाय 17 अशी दाखवून उर्वरीत जागा ही अतिक्रमीत असल्याचे सांगत घर उतरवून घेण्याची नोटीस ग्रामपंचायतीने शिंदे यांना लागू केली. तेव्हापासून शिंदे यांची घर वाचवण्याची धडपड सुरु आहे. यासंदर्भात 2013 मध्ये शिंदे यांनी न्यायालयातून मनाई हुकूम आणला असलातरी घर जाऊ नये यासाठी व्यवस्थेशी त्यांना गेल्या 9 वर्षापासून झुंजावे लागत आहे. जि.प सदस्य हंबीरराव पाटील यांचा राजकीय दबाव असल्याने या प्रकरणी न्याय मिळत नसल्याचे मधुकर शिंदे यांनी बैठकीत सांगितले. 

दरम्यान, 18 आदेशानंतरही कारवाई शुन्य मंत्रालयातील लोकशाही दिनात गेलेल्या तक्रारीनंतर ही खाडाखोड बेकायदेशीर असून अतिक्रम ठरवणारी उपसमितीच बेकायदेशीर असल्याने तत्कालीन सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांवर कारवाई करावेत असे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले. त्यानुसार जि.प सीईओंच्या आदेशाने ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शाहूवाडीचे गटविकास अधिकारी उदय पाटील यांना आदेश काढण्यात आले. 

दोन वर्षापासून  चौकशी  सुरु 
आजअखेर 18 आदेश काढले असलेतरी चार ग्रामसेवकांच्या खातेनिहाय चौकशीपलिकडे कोणतीही कारवाई झालेली नाही. चौकशी सुरु असतानाही भोसले हे सध्या ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत, तर जाधव व भाट यांची जिल्ह्याबाहेर तर मुल्‍ला यांची तालुकातंर्गत बदली झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून ही चौकशी  सुरु असून कारवाई  अद्याप झालेली 
नाही.