Thu, Sep 24, 2020 08:10होमपेज › Kolhapur › ‘स्मोकिंग झोन’च्या धुरात तरुणाई गुरफटली

‘स्मोकिंग झोन’च्या धुरात तरुणाई गुरफटली

Published On: May 15 2019 1:51AM | Last Updated: May 15 2019 1:14AM
कोल्हापूर : शेखर दुग्गी

आजवर पानटपर्‍यांवर उभे राहून सिगारेटचे झुरके मारणारे ‘स्मोकर’ आपण पाहतच आलो आहे. मात्र आता  पानटपर्‍या या पानटपर्‍या राहिल्या नसून हायटेक ‘स्मोकिंग झोन’ बनू लागल्या आहेत. 
पानटपरीमागे बसायला निवांत जागा, पिण्यासाठी थंड पाणी, गप्पा मारण्यासाठी हवा तितका वेळ आणि मालकाकडून हवी ती पुरवली जाणारी सोय, अशी ओळख या झोनची बनली आहे. अशा या ‘स्मोकिंग झोन’च्या विळख्यात तरुणाई आडकत चालली आहे.

कार्पोरेट शहरातील हे स्मोकिंग झोनचे लोन आता कोल्हापुरात आले आहे. सध्या शहरात शेकडोहून अधिक असे स्पॉट तयार झाले आहेत. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सिगारेट ओढणार्‍यांची धुराडीच येथे पेटलेली असते. अशा झोनच्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुणाईचे जथ्थेच्या जथ्थे पाहायला मिळतात. चेन्स स्मोकर तर या ठिकाणी दिवस-रात्र पडून असतात. यासोबतच अनेक शाळा, महाविद्यालयांचे तरुण तास चुकवून याठिकाणी झुरके मारत बसतात. 

स्मोकिंग झोनमधून बाहेर पडणारा धूर म्हणजे त्या भागात चर्चेचा विषय ठरत आहे. या धुराचे परिणाम येथील सामान्य नागरिकांवर होऊ लागले आहेत. याच त्रास नागरिक सहन करत आहेत. सिगारेट ओढणे आरोग्यास हानीकारक अशी जाहिरात सरकारमार्फत प्रसिद्ध होत असताना त्याकडे दुर्लक्ष करीत या झुरक्यांच्या वलयात तरुणाई अडकत चालली आहे. 

किशोरवयीन तरुणही झुरक्यांच्या विळख्यात
एखाद्या चित्रपटात दोन बोटांच्या कैचीत सिगारेटचे थोटक घेऊन स्टाईलमध्ये उभारलेला हिरो दाखविला जातो. त्याच्या या वाईट कृत्यांचेच अनुकरण करण्याकडे तरुणाई वळू लागली आहे. महाविद्यालयीन नव्हे तर शालेय विद्यार्थीही या झोनच्या आहारी गेले आहेत.

 अ‍ॅक्टिव्हपेक्षा जास्त धोका पॅसिव्ह स्मोकरला
बर्‍याच वेळेस या स्मोकिंग झोनवर सिगारेट न पिणारे (पॅसिव्ह स्मोकर) केवळ टाईमपास म्हणून सिगारेट ओढणार्‍या (अ‍ॅक्टिव्ह स्मोकर) मित्रांसोबत जातात. अशा मित्रांसोबत जाताना तुम्ही विचार कराच. कारण स्मोकिंग करणार्‍या मित्रापेक्षा त्या धुराचा जास्त धोका सिगारेट न ओढणार्‍याला असतो. सिगारेटचा तो धूर कोणत्याही फिल्टरशिवाय श्‍वसनावाटे थेट फुफ्फुसात जातो. यामुळे भविष्यात गंभीर परिणामाला सामोरे जावे लागू शकतात.