Tue, Dec 10, 2019 09:55होमपेज › Kolhapur › जागतिक हास्य दिन : स्माईल प्लीज..!

जागतिक हास्य दिन : स्माईल प्लीज..!

Published On: May 05 2019 1:56AM | Last Updated: May 05 2019 1:06AM
कोल्हापूर ः एकनाथ नाईक 

एखाद्या व्यक्‍तीच्या चेहर्‍यावर हसू असणे म्हणजे त्याच्या आनंदी मनाचे लक्षण असते. जीवनात नेहमी आनंदी असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्‍तीच्या हस्यामध्ये एक वेगळेपणा लपलेला असतो; पण हसण्यामागे एक वैज्ञानिक कारणदेखील दडलेले असते. व्यक्‍तीच्या जीवनात हसणे आरोग्यदायी आहे. ज्यावेळी आपल्या चेहर्‍यावर हसू येते, तेव्हा एंडोफिन हार्मोन्सचा स्राव होतो. यामुळे मानसिक ताणतणाव दूर जाऊन व्यक्‍तीचा मूड हार्मोन्समुळे सुधारतो. यामुळे हसा अन् हसतच राहा...

एंडोफिन हा मेंदूच्या न्यूरॉन्समध्ये तयार केलेला उपकारक पदार्थांचा एक समूह असून, वेदना कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे व्यक्‍तीच्या भावनिक अवस्थेला प्रभावित करण्याचे कार्यदेखील यामुळे होते. प्रामुख्याने उच्च रक्‍तदाबाच्या रुग्णांसाठी 

हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे. एन्डॉरफिन हार्मोन्समुळे रक्‍तदाब नियंत्रणात राहतो. हसताना चेहर्‍याची हालचाल होत असते. त्यामुळे हसणे हा चेहर्‍याचा व्यायामापैकी एक आहे. एका स्मााईलमुळे चेहर्‍यावरील 26 स्नायूंचा व्यायाम होतो. 

हसल्यामुळे निरोगी आयुष्य जगता येते. त्याचबरोबर ताणतणावही कमी होऊन सकारात्मक विचारसरणी निर्माण होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हसण्यामुळे रक्‍तप्रवाह सुधारतो. हसल्याने पूर्ण शरीर हलते. शरीराची हालचाल झाल्याने प्रत्येक अवयवांची हालचाल होते. त्यामुळे प्रत्येक अवयव शरीरात रक्‍ताचा बॅलेन्स सुधारण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. मनमोकळेपणाने किमान 10 मिनिटे हसल्याने शांत झोप लागते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

जगातला पहिला हास्य क्‍लब 12 एप्रिल 1995 मध्ये डॉ. मदन कटारिया यांनी लोखंडवाला कॉम्प्लेक्स मुंबई येथे स्थापन केला. भारतात 10,000 हास्य क्‍लब स्थापन झाले आहेत. कोल्हापुरात पहिला हास्य क्‍लब 20 जानेवारी 1998 मध्ये चालू झाला. सध्या शहरात 25, तर जिल्ह्यात 45 हास्य क्‍लब अस्तित्वात आहेत. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन सर्वत्र साजरा केला जातो. 

खळखळून 10 मिनिटे हसल्याने चेहर्‍याचा व्यायाम होतो, तसेच  त्वचा टवटवीत राहते. मानसिक आजार कमी होतो. दमा, मधुमेह, रक्‍तदाब कमी होऊन रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.
- डॉ. दिलीप शहा