घरात घुसून महिलेला लुटले; रोकड लंपास

Last Updated: Oct 11 2019 1:40AM
Responsive image

Responsive image

कोल्हापूर : प्रतिनिधी

बंद दारामागील कडी उचकटून चोरट्यांनी घरात घुसत महिलेला मारहाण करून लुटल्याची घटना जिवबा नाना पार्कात बुधवारी मध्यरात्री घडली. 

नंदिनी सिद्धेश वाकुडे (वय 25, महालक्ष्मी पार्क) असे जखमी महिलेचे नाव आहे. चोरट्यांनी घरातील रोख पाच हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद जखमी महिलेने पोलिसांत दिली.

सिद्धेश वाकुडे हे पत्नी नंदिनी व दोन मुलांसोबत जिवबा नाना पार्क परिसरातील महालक्ष्मी पार्क येथे भाडेकरू म्हणून राहण्यास आहेत. सिद्धेश वाकुडे हे कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी ते कपडे विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरी पत्नी व दिक्षा, सिद्धेश ही मुले होती. मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या बंद घराच्या दाराची कडी अज्ञातांनी उचकटली. घरात प्रवेश करताच नंदिनी यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. चोरट्यांनी त्यांना जबर मारहाण केली. मुलांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

भयभीत नंदिनी यांनी याची माहिती तत्काळ घरमालकांना दिली. त्यांनी जखमी नंदिनी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटना समजल्यानंतर नंदिनी यांचे पती सिद्धेशही रुग्णालयात आले. या घटनेची नोंद गुरुवारी करवीर पोलिसांत झाली.

दोन संशयित ताब्यात

नंदिनी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून संशयितांचा शोध सुरु करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या वर्णनावरून दोन संशयितांना चौकशीसाठी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.