Sat, Oct 31, 2020 12:42होमपेज › Kolhapur › आंतरराष्ट्रीय टपाल दिन : मुल्लाणींची पोस्ट मास्टर म्हणून खडतर सेवा

आंतरराष्ट्रीय टपाल दिन विशेष : मुल्लाणी यांची ३९ वर्षे पोस्ट मास्टर म्हणून खडतर सेवा

Last Updated: Oct 09 2020 10:36AM

लालासाहेब मुल्लाणी आणि भैरू रामा बुचडेआंतरराष्ट्रीय टपाल दिनानिमित्त 

पुढारी ऑनलाईन डेस्क 

आजच्या डिजिटल जमान्यात पत्र व्यवहार फारसा होत नसला तरी इतर व्यवहार, गोष्टींना मात्र टपाल खात्याची आवश्यकता आहेच. त्या त्या व्यक्तींना त्यांचे वेळेत पत्र मिळावे, त्या त्या संस्थेला अहवाल मिऴावेत, रजिस्टर वेळेत पोहोचवणे असो वा मनीऑर्डर किंवा पार्सल पोस्टमनपासून टपाल खात्यातील अधिकारी सर्वचजण यासाठी मेहनत घेत असतात. आंतरराष्ट्रीय टपाल दिनाच्या औचित्याने (९ ऑक्टोबर) अशीच अविरत सेवा देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ब्रँच पोस्ट मास्टर लालासाहेब मुल्लाणी यांच्या टपाल खात्यातील अनुभवाविषयी आणि वरणगे पाडळीतील खास टपाल खात्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. 

लालासाहेब बाबालाल मुल्लाणी हे कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळी गावचे आहेत. या गावचे रहिवासी आणि ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून ते येथे २० फेब्रुवारी, १९८१ पासून गेली ३९ वर्षे कार्यरत आहेत. वरणगे, पाडळी आणि नितवडे या तिन्ही गावांची जबाबदारी ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून त्यांनी लिलया पेलली आहे. आज त्यांचा अनुभव येथे सांगण्याचं खास कारण म्हणजे, वरणगे पाडळीत १९८० पासून पोस्ट ऑफिस आहे आणि वरणगे, पाडळी आणि नितवडे गावासाठी असणाऱ्या या एका पोस्ट ऑफिसमधील काम दोन कर्मचारी पाहतात. एक म्हणजे स्वत: मुल्लाणी (वय ६१) आणि दुसरे भैरू रामा बुचडे (वय ६४). या दोघांनी वयाची साठी उलटली आहे. पण, कामातील जोश, उत्साह मात्र अद्याप कायम आहे. 

महाराष्ट्रात पहिले तर भारतात दुसऱ्या क्रमांकावर स्थान

विशेष म्हणजे, १ जून ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत या कालावधील वरणगे पाडळी पोस्ट ऑफिसने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची खाती उघडण्यात महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवले आहे. तर देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सरकारने जनतेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक नावाच्या योजनेंतर्गत बचत खाते उडण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याअंतर्गत देशभरात पोस्ट ऑफिस यांनी ही योजना सुरू केली. १०० रूपये भरून या योजनेचे खाते उघडता येते. मुल्लाणी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तीन महिन्यात १ हजार ६४७ या योजनेची खाती उघडली. मात्र, यासाठी त्यांना तितकेच मेहनतही घ्यावी लागली. 

सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या पोस्टाच्या इतर कामांबरोबर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची खाती उघडण्यास प्राधान्याने लक्ष दिले. मुल्लाणी यांनी आपले वरीष्ठ संदीप कडगावकर (इन्स्पेक्टर) आणि असिस्टंट माने यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेबद्दल जनजागृती केली. विशेषत: महिलांना याचे महत्त्व पटवून दिले. आपले पैसे बुडणार नाहीत, याचा विश्वास बसल्यानंतर लोकांनीही प्रतिसाद दिला. गावात सर्व्हे करत खाते उघडण्यात आली. लोकांचा विश्वास जपत एका योजनेसाठीही प्रामाणिकपणे झटणारे, काम पाहणारे असे मुल्लाणी आहेत. त्यांना पोस्टमन बुचडे यांचीही तेवढीच साथ मिळाली आहे. 

मुल्लाणी यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले असता ते म्हणाले, आज इंटरनेटच्या जमान्यात पाकिटे, पोस्टकार्ड कमी झाले तरी रजिस्टर, विविध संस्थांचे अहवाल, मासिके आणि अन्य कागदपत्रांबाबत काम सातत्याने पोस्टात सुरूच असते. मुल्लाणी यांच्या पोस्टातील अतुलनीय कामाबद्दल त्यांनी २०१०-२०११ रोजी ग्रामीण डाक जीवन विमामध्ये उत्कृष्ट कामासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तर डिसेंबर २०१९ पासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची असंख्य खाती उघडल्याने ऑफिसकडून प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले. २०१९ रोजी ११३ खाती उघडल्याने एक ट्रॉफी तर इतर योजनांची खाती उघडल्याने ऑफिसने ट्रॉफी देऊन सन्मान केला आहे.   

सामाजिक कार्य 

२०१९ च्या महापुरात मुल्लाणी यांनी स्वखर्चाने २८८ कुटुंबाना अन्नधान्याची मदत केली. तसेच कोरोना कोरोना काळात रिक्षा चालकांनाही मदत केली. तसेच मास्कचे वाटप करणे, असे मदतीचे कार्य त्यांच्याकडून सुरू असते. 

 "