Thu, Feb 27, 2020 21:45होमपेज › Kolhapur › विनातिकीट प्रवासी येणार ‘रेकॉर्ड’वर!

विनातिकीट प्रवासी येणार ‘रेकॉर्ड’वर!

Published On: Oct 06 2019 1:35AM | Last Updated: Oct 05 2019 11:19PM
कोल्हापूर : अनिल देशमुख

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणार्‍यांचे रेकॉर्ड तयार केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून अशा विनातिकीट प्रवास करणार्‍यांची माहिती संकलित केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक करण्याचा विचार आहे.

विनातिकीट प्रवासी रेल्वेसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आहेत. त्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तिकीट काढत नसल्याने रेल्वेला तर भुर्दंड बसतोच; पण तिकीट काढून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या हक्‍कांवरही गदा येते. यामुळे अशा विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेकडून सातत्याने कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, प्रवाशांची संख्या आणि उपलब्ध कर्मचारी यांच्यात प्रचंड तफावत असल्याने विना तिकीट प्रवास करणार्‍या सर्वांवर कारवाई करणे शक्य होत नाही.

वेळेवर गाडी पकडण्यासाठी अनेकजण विना तिकीट प्रवास करत असतात. गाडीचा दर्जा माहित नसल्यानेही अनेकजण चुकीचे तिकीट घेऊन प्रवास करत असतात. मात्र, अशांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. याउलट जाणीवपूर्वक विनातिकीट प्रवास करणार्‍यांची स्ंख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यात सातत्याने वाढच होत चालली आहे. विना तिकीट प्रवास करणार्‍यांवर नियंत्रण ठेवता यावे याकरिता रेल्वेकडून विविध प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

विना तिकीट प्रवास करणार्‍यांचे आता रेकॉर्डच तयार करण्याचा रेल्वेचा विचार आहे. विना तिकीट प्रवास करताना आढळून आलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाई दरम्यान त्याचे नाव, त्याचा फोटो, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी सर्व माहिती घेतली जाणार आहे. अशी सर्व माहिती संकलित केली जाणार आहे. भविष्यात ही माहिती सार्वजनिक करण्याचा रेल्वेचा विचार आहे. यासह माहिती संकलित झाल्यानंतर एकच व्यक्‍ती दुसर्‍यांदा आढळून आला तर त्याच्या कारवाईचे स्वरूप अधिक कडक होण्याचीही शक्यता आहे. 

सहा महिन्यांत 4 कोटी 63 लाखांचा दंड

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने एक एप्रिल ते 30 सप्टेंबर या सहा महिन्यांत कोल्हापूर ते मिरज, मिरज ते पुणे, पुणे ते मळवली आणि पुणे ते बारामती या विभागांत कारवाई करण्यात आली. यामध्ये विनातिकीट प्रवास करणारे 82 हजार प्रवाशी आढळून आले. संबंधितांकडून 4 कोटी 63 लाख रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी याच सहा महिन्यांच्या कालावधीत 74 हजार प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 4 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. या कालावधीत विनातिकिटांसह कमी अंतराचे तिकीट, तिकीट वेगळे आणि प्रवास वेगळ्या दर्जातून अशा 1 लाख 78 हजार 650 प्रकरणांत कारवाई करण्यात आली होती. त्यात 9 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विनातिकीट प्रवाश्यांना तिकिट सुलभरित्या मिळावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तरीही विनातिकिट प्रवाशांची संख्या वाढतच आहे. यामुळे त्यांचे रेकॉर्ड तयार करण्याचा रेल्वेचा विचार सुरू आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग.