Tue, Jul 07, 2020 18:55होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचे ऋण विसरणार नाही : एन. डी. (video)

कोल्हापूरचे ऋण विसरणार नाही : एन. डी. (video)

Last Updated: Jan 30 2020 2:05AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 
माझ्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रांतील वाटचालीत कोल्हापूरच्या जनतेचे मोठे योगदान आहे.  कोल्हापूरकरांनीच  मला घडवले आहे. त्यामुळे त्यांचा मी सदैव ऋणी राहीन, असे   उद‍्गार ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी काढले.  राजाराम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राजाराम महोत्सवात प्रा. पाटील यांना  दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते  ‘राजाराम जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. पाटील बोलत होते. शाल, श्रीफळ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील हे प्रख्यात विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वनिष्ठ राजकारणी आणि निष्ठावंत समाजकारणी आहेत. गेल्या सत्तर वर्षांपासून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय जीवनात कार्यरत आहेत. शिक्षण, राजकारण आणि समाजकारणात मूलभूत परिवर्तन आणण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या सर्वंकष कल्याणासाठी त्यांनी अविरत समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक लढे उभे केले. चळवळी केल्या, आंदोलने केली. राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करणार्‍या ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या एका फळीचे ते प्रतिनिधी आहेत.

रयतेला मोफत व सक्‍तीचे शिक्षण मिळाले पाहिजे, अशी आग्रही  भूमिका राजर्षी शाहू महाराज यांनी घेतल्याचे सांगून प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षणाची जी ज्योत पेटवली ती शाहू महाराजांनी शेवटपर्यंत तेवत ठेवली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच   कोल्हापुरात सर्व जाती-धर्मांतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना  केली.  बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांंच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली. शिक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन प्रत्येकाला मोफत व सक्‍तीचे शिक्षण घेण्याचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज पहिले राजे होते. राजा असूनही त्यांनी सदैव सामान्य जनतेच्या हिताचा विचार केला. यातून राजाराम महाविद्यालयाला आर्थिक मदत करून बडोदा व मुंबईनंतर दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय असा  राजाराम महाविद्यालयाचा नावलौकिक केला.  

या महाविद्यालयात दिलेल्या शैक्षणिक सुविधांमुळे अनेक विद्यार्थी घडले, ज्यांनी राजकीय, सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. याचे सर्व श्रेय राजाराम महाविद्यालयाला अर्थात शाहू महाराज यांना जाते. महाविद्यालयाला तत्कालीन प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पवार यांचा सहवास लाभला, तसेच शिवाजी विद्यापीठ उभारणीचा  मी साक्षीदार ठरलो याचा मला अभिमान आहे, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

मी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका छोट्याशा गावातून कोल्हापुरात आलो. राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेतले. याच कोल्हापुरात राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. 1985 मध्ये कोल्हापुरातून  शेकापच्या वतीने निवडणूक लढवली. तेव्हा हे बाहेरचे पार्सल आहे. याला बाहेरच पाठवा, असे वसंतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला सांगितले होते; पण कोल्हापूरकरांनी ते ऐकले नाही.  कोल्हापूरच्या विकासासाठी आपण अनेक आंदोलने केली. त्यात अनेक कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून लढले.  टोलच्या लढ्याला त्यातूनच यश मिळाले. कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्‍न सुटावा. हे पाहण्यासाठी आजच्या तरुण पिढीकडून ऊर्जा मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली.

डॉ. जाधव म्हणाले, देशाला शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे. जेव्हा परदेशात ऑक्सफर्ड, केंबिजसारखी विद्यापीठेही नव्हती, त्या काळी भारतात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला अशी विद्यापीठे होती. शिक्षणाचा इतका श्रीमंत वारसा असताना आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे? क्यूएक्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये जगातील जी शंभर विद्यापीठे आहेत, त्यात भारतातील एकही बसत नाही, ही शोकांतिका आहे. तुमचे गुण वाढत चालले आहेत; पण शिक्षणाचा स्तर वाढला का? यासाठी शिक्षण व्यवस्थेत बदल करणे आवश्यक आहे. 

भारत स्वतंत्र झाला तेव्हा  12 टक्के साक्षरता होती. आज 74 टक्के लोक साक्षर आहेत, तरीदेखील देशात साक्षर नसलेल्या लोकांची संख्या 43 कोटी आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, कोठारी आयोगाने 1968 मध्ये त्यावेळच्या जीडीपीनुसार अर्थसंकल्पात सहा टक्के तरतूद शिक्षणावर करावी, अशी शिफारस केली होती. मात्र, आजही शिक्षणावर 3.8 टक्के खर्च होत आहे. केंद्र सरकारने यावर्षी 400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून 10 केंद्रीय स्तरावरील विद्यापीठे आणि दहा खासगी विद्यापीठे निर्माण केली जाणार आहेत.  केजी टू पीजी अशी 27 कोटी मुले शिक्षण घेत आहेत. यामुळे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले, त्यासाठी पावले उचलली तर देशाचा शैक्षणिक दर्जा निश्‍चित वाढणार आहे.

भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. 65 टक्के लोक 35 वर्षांखालील आहेत. 2030 मध्ये भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्र होणार आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, या तरुण लोकसंख्येची ऊर्जा देशाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे. सध्याची शिक्षण पद्धती रोजगार मिळवून देऊ शकत नाही. शिक्षण व्यवस्थेत बदल केल्याखेरीज डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट इंडिया यासारख्या संकल्पना सत्यात उतरणार नाहीत. यामुळे शिक्षण रोजगाराभिमुख झाल्याखेरीज गत्यंतरच नाही.

केवळ पदवी घेतली म्हणजे सार्थक झाले असे नाही. उलट, पदवी घेतल्यानंतर जीवन सुरू होते, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, आमच्या वेळी इंटरनेट, लॅपटॉप आदी काही नव्हते. तुम्ही गुगलद्वारे जगातील कोणत्याही विद्यापीठातील शिक्षण घेऊ शकता. जगात तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे. अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयानेही स्पर्धा परीक्षा केंद्रांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सुविधांचा लाभ घ्या. विविध क्षेत्रांत राजाराम महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.

सीमालढा, टोल तसेच खंडपीठाचे आंदोलन आदी लढ्यांत आपण बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, एस. एम. जोशी, प्रा. एन. डी. पाटील यांच्यासमवेत एकत्रित काम केले आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य अण्णासाहेब खेमणार म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा प्रसार केला. त्याला प्रा. एन. डी. पाटील यांनी अधिक व्यापकता दिली. या महोत्सवातून नव्या-जुन्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न आहे. यातून जे विद्यार्थी समाजात विविध पदांवर आहेत, त्यांची प्रेरणा नव्या पिढीला मिळेल.

यावेळी गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, मयूर दूध संघाचे अध्यक्ष संजय पाटील व डॉ. विजयकुमार माने यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी मंत्रालय महसूल विभागाचे अवर सचिव पितांबर भोसले, जीएसटी सेंट्रलचे अधीक्षक महेश व्हटकर,अभिनेत्री प्रांजल पालकर, कुसुम वझे, नितीन पवार, उदय धारवाडे, शशिकांत पाटील, हेमंत पाटील, प्रवीण खडके. डॉ. प्रवीण कोडोलीकर, श्रीकांत सावंत, दीपक जेमनीस व आजी - माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाग्यश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानले.

डॉ. प्रतापसिंह जाधव कोल्हापूरचे वैभव : प्रा. एन. डी.
‘पुढारी’कार डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणजे कोल्हापूरचे वैभव आहे. ते असले म्हणजे कोल्हापूरचे प्रतिनिधित्व झाले, असे मी मानतो, अशा शब्दांत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी डॉ. जाधव यांच्या कार्याचा गौरव केला.