Tue, Sep 22, 2020 01:10होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकरांचा नेमका पक्ष कोणता?

कोल्हापूरकरांचा नेमका पक्ष कोणता?

Last Updated: Oct 26 2019 11:57PM
कोल्हापूर : राजेंद्र जोशी

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेस आघाडीचा तंबू उखडून काढत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या ओट्यात मतांचे भरघोस दान टाकले होते. काही अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतेक सर्वच मतदारसंघांमध्ये एवढे विक्रमी मताधिक्य दिले की, इतक्या मताधिक्याची खुद्द महायुतीलाही अपेक्षा नव्हती आणि विरोधकांनी तर जणू हाय खाल्ल्यात जमा होती. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात मात्र याच जनतेने जिल्ह्यात सेनेच्या आबिटकरांचा अपवाद वगळता महायुतीला चारीमुंड्या चित केले. यामुळे कोल्हापूरच्या जनतेचा नेमका पक्ष कोणता? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला स्वाभाविकपणे पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर ‘रोखठोक’ आणि ‘जागरूकता’ असे आहे. सत्तेच्या उन्मादात हवेत गेलेल्यांना जमिनीवर आणणे आणि नव्या होतकरूच्या पाठीवर माती टाकून त्याच्या विजयाचा मार्ग सुकर करणे ही भूमिका कोल्हापूरकर आजवर करत आले आहेत. या भूमिकेने भल्याभल्यांना ताळ्यावर आणले असून नवनिर्वाचितांनाही यानिमित्ताने एक सूचक इशाराही दिला आहे.

कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा आणि त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून त्याचे वर्णन केेले जाते. परंतुु, हे वर्णन तितकेसे सार्थ नाही. प्रारंभीच्या काळात डाव्या विचारांचे गारूड असलेल्या या जिल्ह्यातील जनतेने अनेक वेळेला धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. मग लोकसभेला शेकापच्या दाजीबा देसाईंचा विजय असो, वा विधानसभेला प्रा. एन. डी. पाटील, जनता दलाचे रवींद्र सबनीस, कॉ. कल्लाप्पा मलाबादे असोत, प्रत्येक वेळेला सत्तारूढ काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून कोल्हापूरकरांनी या नेत्यांचा विजयाचा मार्ग सुकर केला. 

जनसुराज्य शक्ती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रोपटेही याच मातीत उगवले आणि सदाशिवराव मंडलिकांनी अपक्ष म्हणून जेव्हा रिंगणात उडी घेतली तेव्हाही याच जनतेने देशात एक नवा विक्रमही प्रस्थापित केला. इतकेच काय स्वातंत्र्योत्तर काळाच्या पहिल्या निवडणुकांमध्ये जनरल थोरातांचा पराभव करून विजयमाला राणी सरकारांच्या मागे मतांची ढाल उभी करणारे कोल्हापूरकरच होते. आणि राजघराण्याचे वारस असलेले संभाजीराजे यांचा पराभव करून याच जनतेेने मंडलिकांमागे आपली ताकद उभी केली. यंदाही विधानसभेला कोल्हापूरकरांनी आपल्या जागरूकतेचे दर्शन घडविले आहे. ‘आम्ही कोणाचाही टिळा लावून कायमपणे वावरत नाही’ असा इशाराच जणू जनतेने राजकीय पक्षांना दिला असून आता नजीकच्या काळात विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ राजकारण करणार्‍या नेत्यांबरोबर राजकीय पक्षांनाही अंतर्मुख व्हावे लागणार आहे. 

रांगड्या बाण्याचा आणि रोखठोक व्यवहाराचा माणूस म्हणून कोल्हापूरकरांकडे पाहिले जाते. त्याच्या मनात आत एक आणि बाहेर एक असे काही असत नाही. जे बुद्धीला पटते तेच तो करतो, मग समोर कितीही मोठी शक्ती असली तरी न डगमगता त्याच्याशी दोन हात करण्यास तो मागेपुढे पाहात नाही. कोल्हापूरकरांची ही जागरूकता किती प्रबळ आहे, याचे नमुनेदार उदाहरण पहावयाचे असेल तर 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाकडे पाहावयास हरकत नाही. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीने संपूर्ण देशात काँग्रेस आणि मित्रपक्षांना व्हाईटवॉश दिला. जनतेने धक्का बसावा, अशी मते महायुतीच्या उमेदवारांना दिली. देशात काँग्रेस जिवंत राहणार की नाही, अशी स्थिती एका बाजूला निर्माण झाली असताना कोल्हापुरात मात्र राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विजयी झाले आणि 2019 च्या निवडणुकीत त्याच सामन्याच्या दुसर्‍या डावात जनतेने महाडिकांना पराभूत करून संजय मंडलिकांच्या पदरात 2 लाख 70 हजार 568 इतके मताधिक्य टाकले. मंडलिकांना जिल्ह्याच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत विक्रमी बहुमत मिळाले होते. 

शेजारी हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचा पराभव करणार्‍या धैर्यशील माने यांनीही असेच मताधिक्य कमविले. या दोन्ही उमेदवारांच्या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 40 हजारांचे मताधिक्य होते. परंतु, अवघ्या चार महिन्यांत केवळ आबिटकरांचा अपवाद वगळता उर्वरित नऊ मतदारसंघांत महायुतीने आपटी खाल्ली. या कृतीने मतदारांनी नेत्यांना आणि राजकीय पक्षांना ‘जनतेला गृहीत धरणे सोडून द्या’ असा इशारा दिला असून कोल्हापूरकरांचा हा ‘जागरूक पक्ष’ अधिक चर्चेत आला तर नवल वाटू नये.

 "