Wed, Sep 23, 2020 10:03होमपेज › Kolhapur › ‘राधानगरी’चे दरवाजे बंद, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

‘राधानगरी’चे दरवाजे बंद, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

Last Updated: Aug 09 2020 11:01AM

राधानगरी धरणराधानगरी : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली होती. त्यातच राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याने व शहर परिसरात पडणा-या पावसामुळे पंचगंगेने धोक्याची ओलांडली होती. त्यामुळे शहरवासीयांच्या मनात पूराची भीती निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, रविवारी राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला व धरणाचे दरवाजे बंद झाले. तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग वाढवल्याने कोल्हापूरवासीयांना पूराच्या धोक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

पंचगंगेच्या महापुराला उतार

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सध्या विजगृहातून १४०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत होत आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी धरण पूर्ण क्षमतेने भरून संध्याकाळी सात वाजता दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. तर रात्री अकरा वाजता व शुक्रवारी पहाटे असे चार दरवाजे उघडल्याने ७११२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

दरम्यान शनिवार पासून पावसाचा जोर कमी झाला असून शनिवारी दोन तर आज सकाळी दोन दरवाजे बंद झाल्यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या फक्त विजगृहातुन १४०० क्यूसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सोडण्यात येत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सकाळी ९ :०० वाजता ४३ फूट ६ इंच इतकी असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. शनिवारी रात्री दहा वाजता पंचगंगेची पातळी ४४ फुटांपर्यंत खाली आली होती. ती शनिवारी रात्री ११ वाजता पाणी पातळी ४३ फूट ११ इंच इतकी झाली. पाणी पातळी कमी होत गेल्याने ती रविवारी सकाळी ९ :०० वाजता ४३ फूट ६ इंचावर आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आलेले पाणीही कमी झाले आहे. आज दुपारपर्यंत पाणी पातळी आणखी कमी होऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

‘पुढारी रिलिफ फाऊंडेशन’तर्फे कोल्हापूर महापालिकेस दोन यांत्रिकी बोटी प्रदान

६९ बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील बहुतांशी सर्व नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. यामुळे पाण्याखाली गेलेले बंधारेही वाहतूकीसाठी खुले होत आहेत. जिल्ह्यात अद्याप ६९ बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

 "