पंचगंगा पात्राबाहेर; ९० बंधारे पाण्याखाली

Last Updated: Aug 05 2020 2:13PM
Responsive image
file photo


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पावसाची संततधार सुरु आहे. या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी बुधवारी (दि.५) रोजी सकाळी पात्राबाहेर पडले आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रात्रीत तब्बल नऊ फूट पाणी पातळी वाढली. धुवांधार पावसामुळे जिल्ह्यातील ९० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहेत. अजून ४८ तास संततधार पाऊस पडणार असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरणात १९९.८९ दलघमी पाणीसाठा आहे. कोयना धरणात ६०.२९ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९०. ८६४ इतका पाणीसाठा आहे. बुधवारी सकाळी सात वाजता राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते. तर अलमट्टी धरणातून ६९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  तसेच जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे

६२ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे, वारणा नदीवरील-चिंचोली व माणगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज व सांगरूळ, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली व शेलोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डी व अडकूर, तुळशी नदीवरील- घुंगुरवाडी, कांचनवाडी, बाचणी, आरे व बीड असे ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

चोवीस तासांत पडलेल्या पावसाची नोंद

जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेल्या पावसाची तालुका निहाय मिमीमध्ये अशी पावसाची नोंद झाली. यात हातकणंगले- ३८.३८ मिमी,  शिरोळ-२५.८५ मिमी, पन्हाळा- ८८.२९ मिमी,  शाहूवाडी- ६४ मिमी, राधानगरी- १०२.२ मिमी, गगनबावडा-३१७ मिमी,  करवीर- ७०.२७ मिमी, कागल- ९०.२९ मिमी, गडहिंग्लज-५५ मिमी, भुदरगड- ७२.४० मिमी, आजरा- ११६ मिमी, चंदगड- १५५ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा 

जिल्ह्यातील धरणांमध्ये बुधवारी सकाळी आठ वाजता पुढीलप्रमाणे पाणीसाठा होता. संतधार पावसामुळे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तुळशी ६१.३३ दलघमी, वारणा ७४५.४२ दलघमी, दूधगंगा ५२८.८३ दलघमी, कासारी ६२.१५ दलघमी, कडवी  ४८.७८ दलघमी, कुंभी ६२.५२ दलघमी, पाटगाव ८१.७७ दलघमी, चिकोत्रा २३.९३ दलघमी, चित्री ३४.३५ दलघमी, जंगमहट्टी २८.९७  दलघमी, घटप्रभा  ४४.१७  दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे  ६.०६ दलघमी असा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ३१ फूट, सुर्वे २८.४ फूट, रुई ५६.८ फूट, इचलकरंजी ५२. ६ फूट, तेरवाड ४३. ६ फूट, शिरोळ ३४. ६ फूट, नृसिंहवाडी २७ फूट, राजापूर १८.३  फूट तर नजीकच्या सांगली १०  फूट व अंकली १२.६ फूट अशी आहे.

वाचा : अयोध्येतील राममंदिर अन् कोल्हापूरकरांची कारसेवा

राधानगरी धरण ८४ टक्के भरले

राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे राधानगरी धरण ८४ टक्के भरले आहे. आज सकाळी साडेसात पासून पॉवरहाउसला चौदाशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावतीच्या पाणी पात्रात वेगाने वाढ होत आहे. आज सकाळी धरणातील पाणीसाठा ७.५ टीएमसी झाला आहे. धरण पूर्ण भरण्यास अद्याप १.३१ टीएमसी पाण्याची गरज आहे. दोन - तीन दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी धरण पूर्ण भरेल, असा अंदाज धरणावरील जलसंपदा अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा : कोरोनाग्रस्त मातांचे बाळंतपण सीपीआरमध्ये सुखरूप