Thu, Feb 27, 2020 22:32होमपेज › Kolhapur › विधानसभेसाठी कोल्हापुरात ’डाव्यां’कडूनही जोरात तयारी

विधानसभेसाठी कोल्हापुरात ’डाव्यां’कडूनही जोरात तयारी

Published On: Oct 01 2019 2:01AM | Last Updated: Oct 01 2019 1:24AM
कोल्हापूर : प्रवीण मस्के

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप हे डावे पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अस्तित्व टिकविण्याबरोबर पक्ष वाढीसाठी सोयीच्या मतदारसंघांत उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. डाव्या पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यभर ठिकठिकाणी उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ‘भाकप’च्या वतीने कोल्हापूर उत्तर मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत लढविला होता. काही दिवसांपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाच्या नॅशनल काउन्सिल सदस्य कॉ. स्मिता पानसरे यांनी पक्षाचे सचिव सतीशचंद्र कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या तरी ‘भाकप’ने एकाच मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. 

शेतकरी कामगार पक्षाकडून 1995, 1999 दोन वेळा तत्कालीन सांगरूळ मतदारसंघातून संपतराव पवार-पाटील विधानसभेवर निवडून गेले. यावेळेसच्या निवडणूकीत शेकापतर्फे जिल्हयातील कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, शाहूवाडी, राधानगरी-भुदरगड या मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे. महाआघाडीकडून शाहूवाडी मतदारसंघ शेकापला सोडण्याबाबत विचार सुरू असून दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे ’शेकाप’च्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने राज्यपातळीवर भाजप-सेनेच्याविरोधात धर्मनिरपेक्ष आघाडीचे नियोजन सुरू आहे. कोल्हापुरातील प्रभाव असणार्‍या मतदार संघात ’माकप’च्यावतीने उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे राज्य कमिटी सदस्याने सांगितले.