Tue, Sep 22, 2020 01:24होमपेज › Kolhapur › राजकीय पक्षांना महिला उमेदवारांचे वावडे

राजकीय पक्षांना महिला उमेदवारांचे वावडे

Published On: Sep 29 2019 1:20AM | Last Updated: Sep 28 2019 11:51PM
कोल्हापूर : प्रिया सरीकर

जिल्ह्यातील राजकारणात महिलांची वाटचाल स्तुत्य असली तरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी देताना मात्र राजकीय पक्षांना महिलांचे वावडे आहे की काय? अशी परिस्थिती आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत माजी आमदार सरोजिनी खंजिरे, आ. संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांच्या व्यतिरिक्‍त महिला आमदार झालेल्या नाहीत. हातांच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच महिलांनी आजवर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यातही सत्ताधारी पक्षांनी महिलांना उमेदवारी नाकारली. किंबहुना, सर्वच राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारीबाबत उदासीनताच दिसून आली. यंदाही जिल्ह्यातून केवळ एकाच महिलेचे नाव चर्चेत आहे. विधानसभेला महिला उमेदवारांचे वावडे असल्याचेच चित्र दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे सध्या सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. जनतेला आता उमेदवार कोण हे जाणून घ्यायचे आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ‘काँटे की टक्‍कर’ होणार असल्याने विधानसभा निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. नेहमीच्या चेहर्‍यांना तर काही ठिकाणी नव्या चेहर्‍यांचे आव्हान राहणार आहे. राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेवून पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. पण यातही अपवाद वगळता महिलांचे नावच घेतले जात नाही.

कोलहापूर जिल्ह्यात दहा मतदारसंघ आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात विधानसभेवर पुरूष आमदारांचे वर्चस्व राहिले आहे. रजनी मगदूम, मनिषा भोसले, डॉ निलांबरी मंडपे, स्वाती कोरी, विजयमाला देसाई, सुरेखा कांबळे यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याचे धाडस केले. या नावांचा अपवाद वगळता आजतागायत विधानसभेसाठी महिला दिसून आल्या नाहीत. विविध क्षेत्रात आता महिलांनी वर्चस्व मिळवले आहे. राजकारणातही जिल्ह्यातील अनेक महिलांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. अशा महिलांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र, राजकीय पक्षांना या महिलांचे वावडे असल्याचे जाणवत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी कोल्?हापूर उत्तरमधून मधुरीमा राजेंचे नाव चर्चेत आहे. पण अद्याप पक्षपातळीवर त्यांची उमेदवारी पुढे आलेली नाही.

सध्य स्थितीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. लोक प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची या पक्षातून त्या पक्षात उड्डाणे सुरु असताना महिला पदाधिकारी मात्र आपापल्या पक्षाशी निष्ठा राखून आहेत. शहरात उत्तर विधानसभा मतदार संघातून मधुरीमा राजे छत्रपतींचे नाव चर्चेत आहे. मात्र त्या काँग्रेस, राष्ट्रवादी की भाजप कोणती वाट धरणार हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. 

 

जिल्ह्यातील महिला आमदार

सरोजिनी खंजिरे

1985-1990

संजीवनीदेवी गायकवाड

2000-2005

संध्यादेवी कुपेकर

 2014-2019