Fri, Feb 28, 2020 00:25होमपेज › Kolhapur › मोरेवाडी, तामगाव घटनांमागे सायलंट किलर?

मोरेवाडी, तामगाव घटनांमागे सायलंट किलर?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : दिलीप भिसे

चाळीस-पंचेचाळीस वर्षीय व्यक्‍तींचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधून ओसाड माळरान विहिरीसह निर्जन ठिकाणी खणीत फेकून देण्याच्या दोन घटना उघड झाल्याने जिल्ह्यात चिंतेसह भितीचेही सावट निर्माण झाले आहे. मोरेवाडी (ता. करवीर) येथे अत्यंत थंड डोक्याने झालेल्या दोन थरारक घटनांमागे ‘सायलंट किलर’ चा हात असावा, असा तपास यंत्रणाचा संशय आहे. आर्थिक, अनैतिक, पूर्ववैमनस्य अथवा अन्य कारणांतून ‘सुपार्‍या’ घेऊन परस्पर काटा काढणार्‍या टोळ्या शहरासह जिल्ह्यात कार्यरत झाल्या असाव्यात का, अशी शंका निर्माण झाली आहे. तामगावातील घटनेने ही शक्यता  गडद झाली आहे.

मारेकरीच काय... मृतदेहाची ओळख पटू शकली नाही !

फेब्रुवारीच्या सप्ताहात मोरेवाडीतील शिवाजी मोरे यांच्या   विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आला. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सिमेंटच्या पोलला तार व नायलॉन दोरीने बांधून फेकून देण्यात आला होता. घटनेला पन्‍नास दिवस होऊनही अजूनही मृतदेहच नव्हे, तर मारेकर्‍यांचाही छडा लागला नाही.

अनैतिक कृत्यातूनच संतापाचा कडेलोट 

मोरेवाडीतील खुनाची घटना अमानुष, क्रूररीत्या झाल्याने अनैतिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा होती. कर्नाटक अथवा अन्य राज्यात अनोळखीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ग्रामीण भागात, मोरेवाडीतील निर्जन माळरानावर फेकून दिल्याचा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा सूर होता. पोलिसांनी जंग जंग पछाडले; पण आजतागायत छडा लागलेला नाही.

दोनही घटनांतील साधर्म्यामुळे अधिकार्‍यांची तारांबळ

 मोरेवाडी येथील घटनेवर उलटसुलट चर्चा चालू असतानाच दोन दिवसांपूर्वी तामवाडी येथील खणीत अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आला. चाळीस वर्षीय व्यक्‍तीचा खून करून मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधून खणीत फेकून दिल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीला आला. मोरेवाडीतील घटनेशी साधर्म्य असलेल्या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. वरिष्ठाधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेऊन चौकशीची सूत्रे अधिक गतिमान केली.
दोनही खुनाच्या घटनांमध्ये एकाच टोळीचा हात असावा, असा वरिष्ठाधिकार्‍यांचा संशय आहे.अर्थात, तो स्वाभाविक आहे. दोनही मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधताना मारेकर्‍याची नायलॉनची दोरी, लोखंडी तारेचा कौशल्याने वापर केला आहे. मृतदेह पाण्यातून बाहेर येऊ नये, अथवा सडलेल्या अवस्थेत शरीराचे अवयव पाण्यावर तरंगू नयेत, हा त्यामागचा मारेकर्‍यांचा हेतू असावा.

सीमाभागातील ‘सुपारी’बाज टोळ्या जिल्ह्यात सक्रिय?

मोरेवाडी येथील घटनेपाठोपाठ तामगाव खणीत सिमेंट पोलला बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने सर्वसामान्यांत घबराट दिसून येते. भरचौकात होणारे हल्ले, गर्दी मारामार्‍या या सार्‍या घटना सामान्यांना नव्या नाहीत; पण सिमेंट पोलला 
मृतदेह बांधून निर्जन ठिकाणी फेकून देण्याचा मारेकर्‍यांचा नवा फंडा काही औरच दिसून येतो. मराठवाडा, विदर्भासह सीमाभागात अशा घटनांमध्ये पुरावाच नष्ट करण्यासाठी ‘सुपारी’बाज टोळ्यांचा फंडा यापूर्वीच्या अनेक घटनांमधून उघड झालेला आहे. त्यामुळे या घटनांमध्येही अशा टोळ्यांची अधिक शक्यता दिसून येते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, two, murdered,  Morewadi Tamgao, area


  •