कोल्हापूर : प्रतिनिधी
सावली गायबचा सोमवारी (दि. 7) अनुभव घेता येणार आहे. सूर्य डोक्यावर येईल तेव्हा कोणत्याच वस्तूची सावली दिसणार नाही. असा हा रोमांचकारी अनुभव कोल्हापूर, मिरज आणि सांगली जिल्ह्यात सात मे, तर सातारा आणि अक्कलकोटला दहा मे, तसेच पुणे, दौंड आणि अलिबागला चौदा मे रोजी हा अनुभव तेथील नागरिकांना मिळणार आहे.
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो; पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवावयास मिळतो. सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर सावली सरळ आपल्या पायाखाली पडते.