Sun, Sep 20, 2020 06:36होमपेज › Kolhapur › पर्यावरण संवर्धनास ऊस पाचट उपयुक्‍त

पर्यावरण संवर्धनास ऊस पाचट उपयुक्‍त

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:20PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : एकनाथ नाईक

तंत्रशुद्ध मार्गदर्शनाद्वारे आणि अत्याधुनिक यंत्राद्वारे बळीराजा शेती करताना दिसतो. गेल्या चार ते पाच वर्षांपासून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात पाचट अभियान राबविले जात आहे. त्यास शेतकरी वर्गांतून अल्प प्रतिसाद मिळत आहे.सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील काही शेतकर्‍यानी अभियानास प्रतिसाद दिला. नंतर मात्र हे अभियान जनजागृतीअभावी कोलमडले आहे. पर्यावरण संवर्धन आणि शेतीच्या फायद्यासाठी ऊस तोडणीनंतरचे पाचट शेतीस उपयुक्‍त ठरत आहे. त्यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी संवाद अभियानाचीच गरज आहे. 

जिल्ह्यात युद्धपातळीवर ऊस तोडणी सुरू आहे. पाणी, कीटकनाशके, रासायनिक खतांचा वारेमाप वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. दिवसेंदिवस जमिनी टणक बनत असून पिकांच्या मुळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सुमारे 9 ते 10 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. जिल्ह्यात 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. या क्षेत्रामधून ऊस तुटून गेल्यानंतर सरासरी 10 टन प्रति हेक्टरी पाला शेतात उपलब्ध होतो. 80 टक्के शेतकरी हा पाला जमीन स्वच्छ करण्याच्या हेतूने अज्ञानपणातून जाळून टाकतात. जाळलेल्या पाल्यामुळे 5 टक्के म्हणजेच 500 किलो राख शेतात शिल्लक राहते.पाला जाळल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होतेच, शिवाय उष्णतेने जमिनीतील उपयुक्‍त जीवजंतू यावर विपरीत परिणाम होतो. राज्यातील उपयुक्‍त ऊस क्षेत्राचा विचार केल्यास जिल्ह्यातील उपलब्ध ऊस क्षेत्राचा 10 लाख टन पाला नाहक जाळला जातो. ही बाब पर्यावरणाबरोबरच जैविक विविधतेला आणि मानवी आरोग्याच्या द‍ृष्टीने दिवसेंदिवस घातक आहे. पाला न जाळता ऊस तोडणीनंतर एक आड एक सरीत ठेवल्यास पर्यावरण प्रदूषणाचे निराकरण होईल. कृषी विभागाने देखील पाचट शेतात ठेवणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देऊन गौरव करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्या शेतकर्‍यांचा आदर्श इतर शेतकरी सुध्दा घेतील.

पाचट ठेवण्याचे फायदे 

*तणाची उगवण होत नाही. 
*जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पाणी बचत. 
*ऊस उत्पादनात 5 ते 6 टनांची वाढ  
*एकरी 2 ते 3 टन सेंद्रिय खत ऊस खोडव्याला मिळते. 
*पुढील पिकास नत्र, स्फुरद, पोटॅश  पिकास उपलब्ध. 
*जमिनीचे तापमान 3 ते 5 डिग्रीने थंड राहते. 
*शेतात गांडूळ व उपयुक्‍त जीवाणूंची नैसर्गिक वाढ होते. 
*पाचट कुजल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड वायूचा उपयोग पिकास होतो.

शेतकर्‍यांनी उसाचे पाचट शेतात ठेवून सुपिकता वाढवावी. यामुळे उत्पादन वाढून आर्थिक फायदा होतो. ऊस तोडल्यानंतर शेतकरी पाला जाळतात आणि शेतातील नैसर्गिकरीत्या असणारे जीवाणू नामशेष करतात. नंतर उत्पादन वाढीसाठी शेतकरी इतर रासायनिक औषधे शेतीला देतात. ‘तुज आहे तुजपाशी परी तू...’ अशी शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे तरुण शेतकर्‍यांनी गावागावांत पाचट अभियान गतिमान करावे. कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल.
एन. एस. परीट  
कृषी अधिकारी, गगनबावडा तालुका