Wed, Aug 12, 2020 21:27होमपेज › Kolhapur › #Women’s day स्‍वप्नालीच्या स्‍व्‍ाप्नासाठी ‘त्‍याची’ साथ(व्हिडिओ)

#Women’s day स्‍वप्नालीच्या स्‍व्‍ाप्नासाठी ‘त्‍याची’ साथ(व्हिडिओ)

Published On: Mar 08 2018 9:53PM | Last Updated: Mar 08 2018 9:53PMकोल्हापूर : संघवी राजवर्धन

ती घरातून बाहेर पडली... चूल आणि मूल या चौकटीच्या पलीकडे जावून  क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी सारी शक्ती एकवटून जाताना तिला साथ मिळते ती तिच्या पतीची... त्याने समाजाची बंधने झुगारून आपल्या पत्नीला मॉडेलिंग क्षेत्रात उतरण्याला पाठिंबा दिला. गृहिणी ते मॉडेल असा प्रवास करणार्‍या सौ. स्वप्नाली जगोजे यांनी पुढारी ऑनलाईनशी जागतिक महिला दिनानिमित्त संवाद साधला.. 

करवीर नगरीत जन्मलेल्या स्वप्नाली जगोजे  यांचे बालपण महाबळेश्वरमध्ये गेले. वडील महावितरण सेवेत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये त्यांची  बदली झाल्यानंतर त्या येथेच स्थायिक झाल्या. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमध्येच झाल्‍यानंतर  पदवीच्या दुसर्‍या वर्षात असताना त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर अगदी उत्तमरीत्या गृहिणीपदाचा कारभार त्यांनी सांभाळला. दरम्यानच्या काळामध्ये त्‍या एका मुलाची आई झाल्या. त्यानंतर मुलगा शाळेत जायला लागल्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये करणार काय?  आपल्याला स्वतंत्रपणे काही करता येईल का?  असे प्रश्न त्यांच्या समोर उभे होते. 

लहानपणापासून असणारी ग्लॅमरस दुनियेची आवड मात्र, त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ही इच्छा त्यांनी आपल्या पतीला बोलून दाखवली त्यांचाही पाठिंबा मिळाला. एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे घरच्या व्यक्तीचीही साथ मिळणे आवश्यक होते. अखेर कुटुंबीयांची साथही त्यांना मिळाली. कोल्हापूरमध्ये ऑडीशन घेण्यात आल्यानंतर त्यात त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करून विजेतेपद मिळवले. 

"या सर्वांच्या साथीमुळेच मी "दिवा मिसेस महाराष्ट्र गृहलक्ष्मी २०१७-१८ चे विजेतेपद मिळवू शकले. मला जे विचार आणि कृती  स्वातंत्र  दिले गेले त्याबद्दल मी कुटुंबीयांची ऋणी आहे."अशा भावाना त्‍यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना व्यक्‍त केल्‍या. 

स्वप्नाली सध्या 'मनमंदिर हाऊस'च्या ब्रँड अँम्बेसिडर आहेत. 'रायझिंग स्टार'  या संस्थेमध्ये  महाराष्ट्राच्या इवेंट हेड म्हणून गेली पाच वर्ष त्या कार्यरत आहेत. त्याचसोबत 'किडझोन अकादमी'च्या त्या संस्थापिका आहेत. वेगवेगळ्या 'एनजीओ'च्या माध्यमातून अनेक सामाजिक कामामध्ये  त्यांचा विशेष सहभाग असतो.

‘‘आत्तापर्यंतचा माझा प्रवास खडतर होता. मी गृहिणी असूनही या क्षेत्राकडे वळाले. माझी इच्छा बोलूनच नाही तर करून  दाखवली. तुमच्याही इच्छा असतील तर तुम्ही त्या बोलून दाखवा मनातील भिती काढून टाका आणि त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा. माझ्यासारखीच तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकाल.’’ असा संदेश  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वप्नाली जगोजे  यांनी महिलांना  दिला आहे.