Wed, Jul 08, 2020 18:48होमपेज › Kolhapur › शिक्षक बदल्यांतील हस्तक्षेप थांबेल?

शिक्षक बदल्यांतील हस्तक्षेप थांबेल?

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 26 2018 11:28PMकोल्हापूर : राजन वर्धन

जिल्हा परिषदेतील शिक्षक बदलीला आता नव्याने सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या मोर्चाला न जुमानता शासनाने बदल्यांसाठी पुन्हा कंबर कसली असून, ऑनलाईन बदल्या करण्याची घोषणा केली आहे. बदल्यांत होणारा हस्तक्षेप थांबविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे; पण आतापर्यंत झालेली ढवळाढवळ आणि त्यातून पाडलेला ‘ढपला’ पाहता खरंच हस्तक्षेप थांबेल का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बदल्या होण्यासाठी आणि न होण्यासाठीही दोन्ही बाजूंच्या शिक्षक संघटनांनी मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनाही धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बदल्या होणार की नाही, याबाबतही शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

एकाच ठिकाणी राहून शिक्षणापेक्षा राजकारणात क्रियाशील राहणार्‍या आणि यातूनही आपल्या कामांसाठी प्रशासनावर दबाव टाकणार्‍या शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी शासनस्तरावरून जिल्हा अंतर्गत बदल्यांचे नियोजन केले आहे.  पण बदली रोखण्यासाठी एरव्ही एकमेकांवर तोंडसुख घेणार्‍या शिक्षक संघटनांनी वाद विसरून एकीने एल्गार पुकारल्यानंतर  बदल्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली; पण याविरोधात दुर्गम शिक्षक संघटनांनी उपोषण केले. त्यावेळी बदल्या करण्याचे आश्‍वासन संबंधितांनी दिले.

दरम्यान, बदली संदर्भातील माहिती भरताना सर्व्हर डाऊनचा फटका आणि ‘स्लो’ नेटमुळे ही प्रक्रिया लांबली. बदल्यांतील हस्तक्षेप टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. असे असले तरी त्यांच्या या म्हणण्याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्‍त केले जात आहेत. कारण नावाला जरी ऑनलाईन असले तरी शिक्षकांनी भरलेली माहिती पडताळण्याचे काम तालुका आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर होणार आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अंमलबजावणीनंतरच दिसणार फलश्रृती

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया जिल्हा परिषदेत चांगलाच गोंधळ निर्माण घालणारी ठरली. ऑनलाईन प्रणालीत रिक्‍त पदे असणारी काही ठराविक गावे यादीतून गहाळ केली होती. त्यामुळे नावाला जरी ऑनलाईन म्हटले जात असले तरी मानवी हस्तक्षेपाशिवाय ते अपूर्णच राहते. त्यामुळे शिक्षक बदल्यांतील हस्तक्षेत थांबेल, हे म्हणणे तुर्तास तरी धाडसाचेच होईल. शिवाय ही प्रक्रिया पारदर्शी म्हणून समोर आणली जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच त्याची फलश्रृती दिसणार आहे.

शिक्षक नेत्यांसह पदाधिकार्‍यांनाही आव्हान

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या जवळपास 9 हजारांवर असून, या शिक्षकांची प्रत्येकी पाच ते दहा मते असल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नेते आपले राजकारण शिक्षक संघटनांच्या मदतीनेच करतात; पण ऑनलाईन बदल्यांमुळे याला मर्यादा येणार आहेत. शिवाय अनेक वर्षे शहरालगत किंवा घरालगत सोयीची शाळा अनेक वर्षे घेऊन राजकीय तसेच प्रशासकीय कामात सहभागी होणार्‍या शिक्षकांचेही धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांसमोर ऑनलाईनचे आव्हान निर्माण झाले आहे. 

Tags : Kolhapur, stop, interference, Teachers, duty