Tue, Jun 02, 2020 02:55
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › धोका कायम; जिल्ह्यात 654 जण संशयित

धोका कायम; जिल्ह्यात 654 जण संशयित

Last Updated: Apr 07 2020 1:05AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

समूह संसर्ग होणार नाही, याची दक्षता प्रारंभीपासून घेत जिल्हा प्रशासन ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी कंबर कसत आहे. त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबर संचारबंदी आणि लाकडाऊनबाबत प्रशासनाने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरातील रुग्णांची संख्या कमी असली तरी गेल्या 12 दिवसानंतर आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्ह्यात 654  जण संशयित असल्याने ‘कोरोना’ फैलावाचा धोका कायम आहे.

जिल्हा प्रशासनाने ‘कोरोना’चा जिल्ह्यात शिरकाव होणार नाही आणि झाला तरी तो वेगाने पसरणार नाही, याची दक्षता प्रारंभीपासूनच घेतली आहे. यामुळे राज्य शासनाने निर्णय घेण्यापूर्वीच जिल्हा प्रशासानाने सर्व गर्दीची ठिकाणे बंद केली. यात्रा-जत्रांसह मंदिरांचे दर्शनही बंद केले. जिल्हाबंदीच नव्हे तर गावबंदी, शहरात प्रभागबंदीही केली. परजिल्ह्यांतून येणार्‍या प्रत्येकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना होम तसेच इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनही केले. या सर्वाचा परिपाक म्हणून आजअखेर जिल्ह्यातील स्थिती अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नियंत्रणाखाली आहे.

जिल्ह्यात पुण्यात आलेल्या एकामुळे पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्याच्यामुळे त्याच्या बहिणीला लागण झाल्याने दोन रुग्ण संख्या झाली. तर मूळची पेठवडगाव येथील असलेली; पण इस्लामपूरमध्ये लागण झालेली एक महिला आढळली. यामुळे जिल्ह्यातील तीन रुग्णांची नोंद झाली. मात्र, हे तीनही रुग्ण तशा अर्थाने जिल्ह्यातील कोणामुळे बाधित झाले नव्हते. या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांपैकी 44 जण हायरिस्कमध्ये होते. तरीही गेल्या 12 दिवसांपासून जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. 

परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी जिल्हा प्रशासन सतर्कच आहे. कारण जिल्ह्यात तब्बल 77 हजारांहून अधिक जण पुणे-मुंबईतून आले आहेत. त्यापैकी 51 हजार जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला तरी अद्याप 25 हजार जणांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. अशातच 654 जण संशयित आहेत. यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्जच ठेवली आहे. अजून 15 दिवस सतर्क राहायला पाहिजे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यात धोका कायम आहे.

जिल्ह्याचा धोका कमी झालेला नाही. यामुळे प्रशासन वारंवार घरातून बाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन करत आहे. नागरिकांनी आता काही दिवस संचारबंदी, लॉकडाऊन आदी कडक पाळले पाहिजे. आठवड्याची भाजी एकवेळा आणली नाही तरी फार फरक पडत नाही. मात्र, ताजी भाजी आणि पाय मोकळे करण्याच्या नादात घरात ‘कोरोना’ घेऊन येण्यास वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे. कसबा बावड्यात आढळलेली महिला भाजी आणण्यासाठी या परिसरात जात होती. आता तिच्या संपर्कात किती आले, त्यापैकी कोणाला लागण झाली तर, लागण झालेल्या त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्‍यांचे काय? असे हे व्यस्त प्रमाणातील प्रश्न वाढतच जाणार आहेत. अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून का होईना नागरिकांनी आता तरी संयम पाळण्याची गरज आहे.

प्रशासनास सहकार्य करा

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. भाजी आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही गर्दी दिसत आहे. अनेक भागांत सोशल डिस्टन्सिंग अक्षरश: बासनात गुंडाळले आहे. रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्याऐवजी कारवाई होऊनही वाहनांची संख्या वाढत चालली आहे. उपनगरात तर कारवाईचा धाकच नसल्यासारखे चित्र आहे. मॉर्निंग वॉक थांबलेले नाही. रात्री फिरण्यासाठी घराबाहेर पडणार्‍यांची संख्या फार कमी झालेली नाही. यासह गल्लीत, कट्ट्यावर रात्री एकत्र बसणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.