Sat, Jul 11, 2020 19:14होमपेज › Kolhapur › आमची लढाई धर्मांध शक्‍तीशी : श्रीपतराव शिंदे

आमची लढाई धर्मांध शक्‍तीशी : श्रीपतराव शिंदे

Published On: Apr 17 2019 2:06AM | Last Updated: Apr 17 2019 1:36AM
कोल्हापूर  : प्रतिनिधी

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, दलित महासंघ, आरपीआय, माकप महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आज गडहिंग्लज शहरात भव्य सभा पार पडली. जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी महाआघाडीच्या सभेत व्यासपीठावर येऊन धनंजय महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून भाजप-शिवसेना युतीवर कडाडून हल्ला चढवला. 

डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. महाडिक यांच्या रूपाने कोल्हापूरला संसदरत्न पुरस्कार मिळाला. पहिल्याच टर्ममध्ये 8 हजार कोटींचा निधी आणणार्‍या महाडिक यांच्याकडून भविष्यात दुप्पट, तिप्पट निधी येणार आणि कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट होणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.  

दलित महासंघाचे नेते प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, निवडणुकीच्या आधी, शिवसेनेने भाजपवर अत्यंत हीन शब्दात टीका केली; पण अचानक त्यांची युती झाली. कोणत्या पक्षाने कुणाला गंडवले, की दोन्ही पक्षांचे नेते जनतेला गंडवत आहेत, असा प्रश्‍न सकटे यांनी उपस्थित केला.  

आ. हसन मुश्रीफ म्हणाले, श्रीपतराव शिंदे यांची साथ मिळाल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे महाडिक यांचा विजय निश्‍चित झाला आहे.
सध्याचे सरकार हे हुकूमशाहीचे सरकार आहे. खुद्द भाजपमधील खासदारांनासुद्धा बोलण्याचा अधिकार नाही. मोदी सरकार हे हुकूमशाहीचे सरकार आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यासाठी हे सरकार काहीही करत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील 5 वर्षे मोदी सरकारला मिळाली तर रस्त्यावर गोळीबार  होईल,  त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार पुन्हा येईल, हाच आमचा अजेंडा असल्याचे श्रीपतराव शिंदे म्हणाले. मोदी सरकारच्या सगळ्याच योजना फसव्या असून, देशात हुकूमशाही आली आहे. म्हणूनच ही निवडणूक महत्त्वाची असून, घटना बदल नको असेल तर या सरकारला पायउतार केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे शिंदे म्हणाले. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, कोण काय करतंय, काय ठरवतंय, याला महत्त्व नसून, एकदिलाने महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना जिंकून आणू, असे आवाडे यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक म्हणजे आपल्या कामाचे सादरीकरण आहे, कारण मी खासदार म्हणून जे काही करायचे होते, ते केले आहे, अशी भावना, धनंजय महाडिक यांनी व्यक्‍त केली. जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांनी दिलेला पाठिंबा आणि आशीर्वाद समाधान देणारा आहे, असे महाडिक म्हणाले.  जनता दलाच्या पाठिंब्यामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळाले, असेही महाडिक यांनी नमूद केले.  

यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर,  अमर चव्हाण, सतीश पाटील, किसनराव कुर्‍हाडे, बी. एन. पाटील-मुगळीकर, विजय पाटील, रामप्पा करीयार,  रामराजे कुपेकर, किरण कदम, शिवाजी खोत, रमेश रिंगणे, शीलाताई  जाधव यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.