Sat, Jul 04, 2020 04:51होमपेज › Kolhapur › विराट जनसभेने महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले

विराट जनसभेने महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले

Published On: Mar 24 2019 3:27PM | Last Updated: Mar 24 2019 9:19PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज (ता.२४)  कोल्हापुरातून फुटला. या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी महाआघाडीवर तुफानी प्रहार करत महायुतीला विजयी करण्याच आवाहन केले. 
 
महायुतीच्या प्रचार शुभारंभासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, सुभाष देसाई, विजय शिवतारे, सुभाष देशमुख,गिरीश बापट आदी नेते उपस्थित होते. 

सभेमधून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रचंड टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, त्यांना आता उमेदवार मिळेनाशे झाले आहेत. त्यामुळे आता कॅप्टनने सुद्धा (शरद पवार यांची माढ्यातून माघार)  माघार घेतली आहे. त्यांच्या पक्षाकडून तिकीटे परत केली जात आहेत. नुसता नावामध्ये राष्ट्रवाद असून चालत नाही, तर मनातून असावा लागतो.

आघाडीचे नेते महाआघाडीमध्ये ५६ पक्ष असल्याचा दावा करत आहेत, पण ५६ पक्ष रजिस्टर केलेले तर आहेत का? अशी विचारणा करत त्यांनी देश चालविण्यासाठी ५६ पक्ष नाही, तर ५६ इंचाची छाती लागते असे त्यांनी ठणकावून सांगितले. आता जनतेनेच ठरवून दिले आहे देशात  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनाच निवडून देणार आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात गरीबी कधीच हटली नाही, हटली ती फक्त काँग्रेसच्या नेत्यांची आणि त्यांच्या चेल्या पेल्याची असा घणाघात त्यांनी केला. 

आपल्या हृदयातला भगवा विधानसभा आणि लोकसभेवर फडकला पाहिजे,  मी अंबाबाईच्या विराट दर्शनाला नतमस्तक होऊन एवढंच मागेन की आम्ही जे काही करतोय ते इमाने इतबारे करतो आहे आणि तुमचं आशीर्वाद हेच आमचं भांडवल आहे आणि तुमच्या या भांडवलाला व तुमच्या विश्वासाला आयुष्यात कधी तडा जाऊ देणार नाही एवढंचं वचन मी शिवरायांच्या साक्षीने तुम्हाला देतो अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महायुतीच्या प्रचार शुभांरभातून घातली. 

शिवसेना आणि भाजपच्या महायुतीची पहिलीच विराट सभा आज कोल्हापुरात झाली. यावेळी ठाकरे यांनी साताऱ्यातून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वच्या सर्व खासदार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.  

यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली. भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर त्यांनी भाष्य करताना पवारांना तेवढे पक्षात घेऊ नका असा टोमणा मारला. शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे अशी जनतेची इच्छा होती. आम्ही युती होण्यापूर्वी संघर्ष केला, पण तो खुलपणाने केला. पाठित खंजीर खुपसणारे आम्ही नाही, आम्ही खुर्चीचे वेडे नाही, पण आम्हाला सत्ता हवीच आहे, ती आपल्यासाठी असे उद्धव म्हणाले. युती झाल्यानंतर  त्यांचा टायर पंक्चर झाल्याची खोपरखळी उद्धव यांनी मारली.